आराेपी भावाला तीन दिवसांची ‘पीसीआर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:14+5:302021-07-03T04:07:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : अल्पवयीन प्रेयसीसाेबत लग्न करण्यावरून उद्भवलेल्या भांडणात मधल्याने धाकट्या भावाचा चाकूने गळा चिरून व पाेटावर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : अल्पवयीन प्रेयसीसाेबत लग्न करण्यावरून उद्भवलेल्या भांडणात मधल्याने धाकट्या भावाचा चाकूने गळा चिरून व पाेटावर वार करून खून केल्याची घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे गुरुवारी (दि. १) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात अटक करण्यात आलेल्या आराेपीला सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. बी. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने तीन दिवसांची अर्थात रविवार (दि. ४)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
गीतेश रामदास मानकर (वय २९, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) असे मृताचे, तर सतीश रामदास मानकर (३३, रा. वेकाेली काॅलनी, वलनी, ता. सावनेर) असे अटकेतील आराेपीचे नाव असून, दाेघेही सख्खे भाऊ हाेत. गीतेश त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसाेबत लग्न करण्यास आग्रही हाेता. प्रेयसी व गीतेश लग्न करायला तयार असले तरी दाेघांच्याही कुटुंबीयांचा या लग्नाला विराेध हाेता. त्यातच प्रेेयसीच्या माेठ्या बहिणीच्या पतीने गीतेशला तिच्यापासून दूर राहण्याची व तिच्याशी लग्न केल्यास पाेलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिली हाेती.
याच कारणावरून गीतेश व सतीश यांच्यात दारू प्यायल्यानंतर भांडण झाले. याच भांडणातून सतीशने गीतेशचा बंद खाेलीत चाकूने वार करून खून केला. त्याला पाेलिसांनी गुरुवारी (दि. १) सायंकाळी ताब्यात घेत अटक केली. शिवाय, शुक्रवारी दुपारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर. बी. कुळकर्णी यांच्या न्यायालयासमाेर हजर केले हाेते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक मनाेज मेश्राम व शिपाई गाेविंदा दहीफळे यांनी दिली.
...
घरातील वातावरण शांत
गीतेशचा खून दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आला. पाेलीस घटनेच्या दाेन तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांना खुनाची माहिती सायंकाळी कळली. पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी मृत गीतेशबद्दल सर्व कुटुंबीयांना पाेलीस अधिकाऱ्यांनी तपशीलवार विचारपूस केली. कुटुंबीयांसह आराेपी सतीशने पाेलिसांना संपूर्ण घटनाक्रम अतिशय शांततेत सांगितला. कुणाच्याही चेहऱ्यावर दु:ख, भीती किंवा आनंद दिसून येत नव्हता. कुटुंबीयांनी या घटनेची इतरांना माहिती मिळणार नाही, याची काळजी घेतली हाेती. ठसेतज्ज्ञ जेव्हा त्याच्या घरी पाेहाेचले, तेव्हा शेजाऱ्यांना गीतेशचा खून झाल्याचे कळले.