नागपुरात रस्त्यावरील अपघातात तिघांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:35 PM2019-02-13T22:35:56+5:302019-02-13T22:36:31+5:30
रस्ता अपघातात युवकासह तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता अपघातात युवकासह तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. पहिली घटना मंगळवारी रात्री हिंगण्यात घडली. विनोद वशिष्ठ सिंह (४८) हावडा, पश्चिम बंगाल, असे मृताचे नाव आहे. ते हिंगणा येथील डांबर प्लान्टमध्ये प्रभारी पदावर कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते प्लान्टचे वाहन महिंद्रा एम. एच. ४०, ए. के. ७३१२ मध्ये देवळी पेंढरी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजता परत येताना ते चालक रवी मिश्रा यांच्या शेजारी बसले होते. वाहनात प्लान्टमधील कर्मचारी गणेशकुमार साहु (२७) रा. सोनारी, झारखंड हा होता. आमगाव देवळी मार्गावर रवी मिश्रा याने बेजबाबदारणाने वाहन चालवून झाडाला धडक दिली. रविच्या शेजारी बसलेले सिंह यांचा यात जागीच मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी रवि मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना ८ फेब्रुवारीला रात्री कोराडीच्या गुमथळात घडली. गुमथळा येथील रहिवासी गणपत पांडुरंग चौरागडे (४५) हे दुचाकीने गुमथळाला जात होते. जेआयटी कॉलेजजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. चौरागडे यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना मंगळवारी रात्री घडली. साईनगर, हुडकेश्वर रोड येथील रहिवासी विकास दीपक जांगडे (३५) रात्री १ वाजता दुचाकीने घरी परत जात होते. घराजवळ ते दुचाकीवरून खाली पडले. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.