बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
By Admin | Published: July 31, 2014 01:09 AM2014-07-31T01:09:17+5:302014-07-31T01:09:17+5:30
नवनिर्मित कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेल्या मुलासह एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील पांडेगाव येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या
पिता-पुत्राचा समावेश : पांडेगाव येथे शोककळा
साळवा : नवनिर्मित कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेल्या मुलासह एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील पांडेगाव येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या कोल्हापुरी बंधाऱ्याचे याच उन्हाळ्यात काम झाले, हे विशेष!
अरुण परसराम धनजोडे (४५) असे वडिलाचे तर त्याचा मुलगा ऋतुपाल अरुण धनजोडे (१४) आणि पुतण्या भारत अशोक धनजोडे (१३) तिघेही रा. पांडेगाव अशी मृतांची नावे आहेत. शेतात काम करीत असलेल्या वडिलांची शिदोरी घेऊन जात असलेल्या ऋतुपालसह भारतही शेतात जाण्यासाठी निघाला. शिदोरी दिल्यानंतर ते दोघेही शेताच्या बाजूला असलेल्या नवनिर्मित बंधाऱ्याकडे गेले. तेथे ऋतुपालचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना भारतही पाण्यात पडला. बराच वेळ होऊनही मुले परत न आल्याने अरुण हा बंधाऱ्याकडे गेला असता पाण्यातून बुडबूड असा आवाज ऐकू आला. त्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात दोघेही पडल्याचे दिसून आले. त्याने त्या दोघांना वाचविण्यासाठी त्यांच्या दिशेने काठी फेकली. मात्र त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही. त्यानंतर दुपट्टा फेकून वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्यात त्याचाही तोल जाऊन तो पाण्यात बुडाला.
सायंकाळ होऊनही तिघेही घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु, ते तिघेही कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोधाशोध केल्यावर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भारत आणि अरुणचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यात आढळला. त्यानंतर दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. गुरुवारी सकाळी पुन्हा घटनास्थळी शोध घेतल्यावर ६ वाजताच्या सुमारास ऋतुपालचा मृतदेह मिळाला. उत्तरीय तपासणीनंतर तिघांवरही पांडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)
नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
नागपूर : बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेणा नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. फिरोज ऊर्फ प्रीतम संतोष लक्षीणे (२८, रा. बुटीबोरी) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रात आढळून आला. याबाबत बुटीबोरी पोलिसांना सूचना मिळताच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. (प्रतिनिधी)
आधार गेला!
पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांपैकी अरुण हा घरातील कर्ता पुरुष होता. त्याला ऋतुपाल हा एकुलता एक मुलगा होता. घरातील दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आधारच गेला. तर भारतचा मोठा भाऊ हा मानसिक रुग्ण असून त्याच्याकडून कुटुंबीयांच्या आशा होत्या. तोसुद्धा कुटुंबासाठी आधार होता. परंतु, या घटनेत त्याचाही मृत्यू झाला.
मृतापैकी भारत हा साळवा येथील चैतन्यश्वर विद्यालयाचा सहावीचा तर ऋतुपाल हा साळवा येथीलच कै. दामोदरराव खापर्डे विद्यालयाचा सातवीचा विद्यार्थी होता.