अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:18+5:302021-07-07T04:11:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नंदनवन, मानकापूर आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत एका पाच ...

Three died in the accident | अपघातात तिघांचा मृत्यू

अपघातात तिघांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील नंदनवन, मानकापूर आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत एका पाच वर्षीय बालकासह तिघांचा करुण अंत झाला.

जुना बगडगंज परिसरात प्रशांत शंकरराव मेंढे (वय ४३) राहतात. सोमवारी सायंकाळी ६च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवर मुलगा राजवीर (वय ५ वर्षे) सोबत जगनाडे चाैकातून जात होते. सिग्नल लाल झाल्यामुळे त्यांनी आपली दुचाकी थांबवली. तेवढ्यात वेगात आलेल्या आरोपी कार (एमएच ३१- डीएस २८३४) चालकाने मेंढे यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे मेंढे आणि मुलगा राजवीर खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना बाजुच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. मेंढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालक आरोपी संजय मुकुंदराव चव्हाण (वय ६०, रा.नवी शुक्रवारी कर्नलबाग) याला अटक केली.

तत्पूर्वी सोमवारी दुपारी ३.१५ वाजता गोरेवाडा-मानकापूर रिंग रोडवर एक अपघात घडला. ट्रक (जीजे ३६-व्ही ५०५५)चा चालक फिरोज पतेजा करिमभाई (वय ५०, रा.राजकोट) याने शेख नूर शेख मेहबूब (वय ६०, रा.गोदावरीनगर) यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. जुनेद शेख जावेद शेख (वय ३०) याने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी फिरोज पतेजाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तिसरा अपघात पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा मार्गावरच्या हरी ढाब्यासमोर मंगळवारी पहाटे ५.१५ ते ५. ३०च्या सुमारास घडला. भरधाव वाहन चालकाने एका अनोळखी व्यक्तीला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्या व्यक्तीचा करुण अंत झाला, विजय बालाजी कारेमोरे (वय ६५, रा. भवानीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. मृताची ओळख पटविण्यासाठी आणि आरोपीचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

---

Web Title: Three died in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.