प्राणघातक हल्ल्याचे तीन वेगवेगळे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:51+5:302021-06-05T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन, पाचपावली आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. अवघ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन, पाचपावली आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. अवघ्या सहा तासांत घडलेल्या या तीन घटनांमध्ये पाच जण जबर जखमी झाले.
नंदनवनमध्ये घरगुती वादातून पुतण्यावर त्यांच्या काकाने आणि चुलतभावाने प्राणघातक हल्ला चढवला. सुरेश अंतुजी मोहुर्ले (वय ५०) आणि त्याचा मुलगा साैरभ (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुरेश मोहुर्ले आणि फिर्यादी मंगेश गुलाबराव मोहुर्ले हे चुलते-पुतणे आहेत. ते न्यू नंदनवनमध्ये राहतात. गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी सुरेश शिवीगाळ करीत असल्याने मंगेशने त्याला हटकले. त्यावरून पुतण्यासोबत वाद घालून आरोपी सुरेशने लोखंडी रॉडने हल्ला चढवला. सुरेशचा मुलगा साैरभ हादेखील लाकडी दांडा घेऊन आला आणि त्यानेही मारहाण केली. नातेवाईक धावले आणि त्यांनी आरोपींना आवरले. त्यानंतर मंगेशने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सुरेश तसेच त्याचा मुलगा साैरभ मोहुर्ले या दोघांवर गुन्हा दाखल केला.
पाचपावलीतील बुद्धनगर हनुमान गल्लीतील रहिवासी शेखर विनोद मडावी (वय २१) आणि राहुल मडावी हे दोघे गुरुवारी रात्री ११ वाजता आरोपी धन्नू ऊर्फ ऋषभ उके (वय २४) तसेच रजत बोरकर (वय २५) याच्या घरासमोर उभे होते. घरासमोर एवढ्या रात्री कशाला उभे आहे, अशी विचारणा करून आरोपींनी शेखर तसेच राहुलसोबत वाद घातला. त्यानंतर दोघांवर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी आरोपींच्या तावडीतून शेखर आणि राहुलला सोडवले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, अमन ऊर्फ विजय बंडू मडावी (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी धन्नू उके आणि रजत बोरकरविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला.
लुटमारीतून चाकूहल्ला
तिसरी घटना गुरुवारी मध्यरात्री कावरापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. शेख जावेद शेख रशीद (वय १८) आणि त्याचा मित्र तुषार हे दोघे पानटपरीजवळ उभे होते. तेथे आरोपी प्रशांत घनश्याम वासनिक (वय २४) आला. त्याने जावेदच्या खिशात हात घालून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. जावेद आणि तुषारने आरोपीचा प्रतिकार केला असता आरोपी वासनिकने दोघांनाही चाकूने जखमी करून पळ काढला. मिळालेल्या माहितीवरून शांतीनगर पोलिसांनी आरोपी वासनिकविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
---