विदर्भातील तीन जिल्हे ‘हिट अलर्ट’च्या ‘हिट लिस्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:01+5:302021-03-05T04:08:01+5:30
निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांच्या मस्तकावर आठ्या पाडल्या आहेत. उन्हाळ्याच्या ...
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांच्या मस्तकावर आठ्या पाडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुुरुवात केली असून, तापमानामध्ये सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळा जाेमात येण्याआधीच हवामान विभागाने हिट अलर्ट जारी केले आहे. विदर्भातील अकाेला, वाशिम आणि ब्रम्हपुरी व चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा अधिक आहे. राजस्थान, गुजरातकडून उत्तर-पूर्व वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मध्य भारतातील तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचा फटका विदर्भालाही बसला आहे. थंडीचा काळ लाेटला आणि लगेच उन्हाचे चटके वाढले आहेत. जाणकारांच्या मते सुरुवातीलाच अशाप्रकारची उष्णता कधी अनुभवली नाही. सर्वाधिक ३९.८ अंश तापमान ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ चंद्रपूर ३९.२, अकोला ३९.१, वाशिम ३८ अंश तापमान नाेंदविण्यात आले. या काळात ही सर्वाधिक नाेंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हवामान विभागाने या तिन्ही ठिकाणी काही भागात उष्ण लहर (हिट वेव्ह) येण्याची शक्यताही नाेंदविली असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र उष्ण लहरीची तीव्रता अधिक नसून फार धाेकादायक नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तरी नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याची सूचना केली आहे.
या जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा ५ अंशाने अधिक आहे आणि पुढचे पाच दिवस तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने नाेंदविला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने एप्रिल व मे महिन्यात काय हाल हाेतील, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने मात्र याबाबत काही सांगता येत नसल्याचे म्हटले आहे.
इतर जिल्ह्याचे तापमान
ब्रह्मपुरी ३९.८
अमरावती ३८.२
नागपूर ३७.७
वर्धा ३७.५
गडचिराेली ३७.२
बुलडाणा ३७
गाेंदिया ३५.५
यवतमाळ ३५
उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान : साहू
हवामान विभागाचे संचालक एम.एन. साहू यांनी सांगितले, सध्या राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूर व विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. थंड किंवा उष्ण प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याचे इतर भागात परिणाम हाेतात. वाऱ्याची दिशा बदलली की आपाेआप तापमान खाली येईल, असा दावा त्यांनी केला. पुढे तापमानात अधिक वाढ हाेईल, ही शक्यताही त्यांनी नाकारली आहे.