नागपुरातील तीन ड्रायव्हिंग कंपन्यांनी १० कोटींचे व्यवहार दडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 09:38 PM2020-03-17T21:38:05+5:302020-03-17T21:42:36+5:30
मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे वस्तू व सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटने मनीष वझलवार व रचना वझलवार संचालक असलेले नागपुरातील मोरेश्वर अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील वझलवार ड्रायव्हिंग स्कूल, उषा मनोहर देसाई संचालक असलेले अक्षय सोसायटी, मनीषनगर येथील देसाई ड्रायव्हिंग स्कूल आणि दिलीप ए. चित्रे संचालक असलेले गाडगे महाराज धर्मशाळा, मेडिकल चौक येथील श्री ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयावर कारवाई करून व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी केली.
तिन्ही ड्रायव्हिंग स्कूल गेल्या २० वर्षांपासून लोकांना मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. हे काम करताना त्यांनी संबंधित विभागाकडून तसेच जीएसटीअंतर्गत अथवा सेवाकर विभागाकडे नोंदणी केल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले नाही. अधिकाऱ्यांनी या स्कूलच्या कार्यालयातून कच्च्या पावत्या आणि रजिस्टर जप्त केले. या कच्च्या पावत्याच्या आधारे तिन्ही स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.
स्कूलने आयकर विवरण आणि अन्य वित्तीय कागदपत्रांमध्ये फार कमी व्यवहाराची नोंद दिसून आली. पण प्रशिक्षणार्थ्यांकडून रोख रक्कम घेतल्याच्या जास्तीत जास्त पावत्या आढळून आल्या. त्याकरिता स्कूलने रोखीच्या कच्च्या पावत्या प्रशिक्षणार्थींना दिल्या आहेत. त्याआधारे स्कूलच्या संचालकांनी सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.