३३ वृद्धांसह तीन कर्मचाऱ्यांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:55+5:302021-05-14T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : स्थानिक स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ३८ ज्येष्ठांना काेराेनाची लागण झाली हाेती. प्रशासनाने वेळीच दखल घेत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ३८ ज्येष्ठांना काेराेनाची लागण झाली हाेती. प्रशासनाने वेळीच दखल घेत त्यांना आराेग्य सेवा पुरवित त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. यातील ३३ आजी-आजाेबा आणि तीन कर्मचाऱ्यांनी नुकतीच काेराेनावर मात केली. उपचारादरम्यान आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेला मानसिक आधार महत्त्वाचा ठरला.
या वृद्धाश्रमात ४८ ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य आहे. यात २४ आजी तर २२ आजाेबा आहेत. त्यांच्या सेवेसाठी नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आप्तस्वकीयांपासून दूर राहणाऱ्या सर्वांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात एकाकीपणा आला आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील प्रत्येक दिवस निरस जात असतानाच यातील ३८ आजी-आजाेबा आणि तीन कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेत काेराेनाने गाठले.
यासंदर्भात ‘लाेकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच तहसीलदार सतीश मासाळ, डॉ. अमित बाहेती, डॉ. संदीप गुजर यांनी वृद्धाश्रम गाठले. त्यांनी लगेच वृद्धाश्रमातील सर्वांची चाचणी करून काही संक्रमितांना नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती केले तर काहींना सावनेर शहरातील काेविड केअर सेंटरमध्ये आणून त्यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. शिवाय, इतरांना वृद्धाश्रमातच विलगीकरणात ठेवून त्यांचीही काळजी घ्यायला सुरुवात केली.
या लढाईत ३३ ज्येष्ठांसह तीन कर्मचाऱ्यांनी काेराेनावर मात केली तर तिघांना मात्र काेराेनाने पराभूत केले. या काळात डॉ. स्नेहा सिंग, परिचारिका कांचन इंगोले, अशोक भुदोलिया, सत्यभामा वाघमारे, पौर्णिमा वऱ्हाडे, स्नेहा पाटील या कर्मचाऱ्यांनी सर्व वृद्धांची काळजी घेत त्यांना वेळाेवेळी मानसिक आधार दिला. त्यामुळे या वृद्धाश्रमात पुन्हा आनंदाचे वातावरण दिसून आले.