नागपुरात दोन बहिणींसह तीन जणींवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:25 PM2017-12-05T23:25:02+5:302017-12-05T23:31:38+5:30
युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : युवतीसह तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना अजनी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोन अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलींच्या वडिलांचा मित्र आहे. अत्याचाराच्या दोन्ही घटनेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पहिली घटना अजनी ठाण्याच्या हद्दीतील असून, पीडित बहिणी ९ व १० वर्षाच्या आहे. त्यांचे वडील मजुरी करतात. आई सोडून गेली आहे. वडिलांची श्रमजीवीनगर येथील ४१ वर्षीय रूपेश प्रभाकर कांबळे याच्याशी मैत्री होती. २६ नोव्हेंबरला पीडित मुलींच्या वडिलांनी कांबळे याला घरी जेवायला बोलाविले होते. त्यांनी जेवणापूर्वी दारूही घेतली. दारू जास्त झाल्याने पीडित मुलींचे वडील झोपून गेले. हीच संधी साधत आरोपीने मुलींवर अत्याचार केला. पीडित मुलींनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तत्काळ आरोपीला फोन लावला मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सोमवारी वडिलांनी अजनी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपी कांबळे याला अटक केली आहे.
दुसरी घटना सदर येथील मंगळवारी कॉम्प्लेक्स येथे घडली. पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी असून, तिची गोवा कॉलनी, सदर येथील रहिवासी १९ वर्षीय जितेश शरद शंकरकर याच्याशी मैत्री होती. ३ डिसेंबरला जितेश तिला फिरायला घेऊन गेला. अमरावती रोडवरील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर वाकी येथे घेऊन गेला. तेथून रात्री परतल्यानंतर मंगळवारी कॉम्प्लेक्समध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर तिला घेऊन तो फिरत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने मुलीला तिच्या मैत्रिणीकडे सोडून दिले. मुलगी न परतल्यामुळे घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीच्या घरच्यांना ती जितेशसोबत गेल्याची माहिती मिळाली. जितेशला विचारणा केल्यानंतर त्याने मुलीची माहिती दिली. मुलीने घरच्यांना घटनेची माहिती दिली. तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल क रून, त्याला अटक केली.
मंगळवारी कॉम्पलेक्स गुन्हेगारांचा अड्डा
सदर मंगळवारी कॉम्प्लेक्समध्ये गेल्या तीन महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. काही दिवस सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला. नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. रात्रीच्या वेळी कॉम्प्लेक्सचा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दुरुपयोग करतात.
काकाला बोलावू नका
कांबळे याने दोन्ही बहिणींवर अत्याचार के ल्यामुळे त्या भयभीत झाल्या होत्या. सुरुवातीला त्या वडिलांपुढे काहीच सांगू शकल्या नाही. वडिलांना त्या रूपेशकाकाला बोलावू नका, ते घाणेरडे आहे असे म्हणाल्या. मुलींच्या या बोलण्यावरून वडिलांना संशय आला.