बकऱ्या चाेरणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:14 AM2021-02-21T04:14:44+5:302021-02-21T04:14:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : नांदागाेमुख (ता. सावनेर) शिवारातील बकरी चाेरी प्रकरणात केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी तीन चाेरट्यांना अटक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : नांदागाेमुख (ता. सावनेर) शिवारातील बकरी चाेरी प्रकरणात केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी तीन चाेरट्यांना अटक केली असून, पसार असलेल्या एका चाेरट्याचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. विशेष म्हणजे, चाेरीला गेलेल्या सातही बकऱ्यांचा शाेध बकरी मालकाने घेतला असून, त्याने त्या सर्व बकऱ्या पिपळा (नारायणवार), ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथून ताब्यात घेत परत आणल्या.
मोरेश्वर धोंडबाजी मारबते (वय ३९), प्रशांत वामन मारबते (२५) व सचिन चंद्रभान मिलमिले (२४) तिघेही रा. नांदागाेमुख, ता. सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, पसार असलेला आराेपी हा वर्धा येथील रहिवासी आहे. त्याचेे जावई नांदागाेमुख येथे राहत असल्याने ताे जावयांकडे आला हाेता. शिवाय, ज्यांनी त्या बकऱ्या विकत घेतल्या, त्यांचाही पाेलीस शाेध घेत आहेत.
या चाैघांनी साेमवारी (दि. १५) दुपारी नांदागाेमुख शिवारातून शेषराव व्यंकटराव घाेडमारे, रा. नांदागाेमुख यांच्या नऊपैकी सात बकऱ्या चाेरून नेल्या हाेत्या. त्यांनी या सातही बकऱ्या पिपळा (नारायणवार) येथील दाेघांना विकल्या हाेत्या. या प्रकरणात तक्रार देऊनही केळवद पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध घेण्यास फारशा हालचाली केल्या नाहीत. शिवाय, शेषराव घाेडमारे यांनी मित्रांच्या मदतीने त्या बकऱ्यांचा शाेध घेऊन पिपळा (नारायणवार) येथून परत आणल्या.
त्यांनी बकऱ्यांचा शाेध घेण्यास थोडी दिरंगाई केली असती तर त्यांना त्या बकऱ्या मिळाल्या नसत्या. सावर तालुक्यात बकऱ्या चाेरीचे प्रमाण वाढले आहे. घटना घडताच पाेलिसांत तक्रारही नाेंदविली जाते; मात्र पाेलीस आराेपींचा शाेध घेण्यात तत्परता दाखवित नसल्याने पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पसार आराेपी व बकऱ्या विकत घेणाऱ्या दाेघांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी सांगितले.