पावसामुळे तीन घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:05+5:302021-07-20T04:08:05+5:30
भिवापूर : रविवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे तालुक्यातील तीन गावांत तीन घरांची पडझड झाली आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान ...
भिवापूर : रविवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे तालुक्यातील तीन गावांत तीन घरांची पडझड झाली आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. रत्नमाला राहाटे रा. जवळी, निलकंठ जिवतोडे रा. बेलरपार व हनुमान नन्नावरे रा. झमकोली यांच्या घरांची पावसामुळे पडझड झाली आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास किमान अर्धा तास व त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुन्हा तासभर पाऊस पडला. यात या घरांची पडझड झाली. दरम्यान नांद मंडलात ४१ मि.मी. मालेवाडा ४५ मि.मी., कारगाव १६.४ मि.मी. व भिवापूरमध्ये १ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी २५.८५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील काही गावात तासभर चांगलाच पाऊस कोसळला आहे. जवळी भागात रस्त्यांवर दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे पावसामुळेच या घरांची पडझड झाली. मात्र अतिवृष्टी नसल्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार नाही, असा सूर प्रशासनाकडून उमटत आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेत, घरांची पडझड झालेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.