नागपुरात वेगवेगळ्या भागात उष्माघाताचे तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:30 AM2018-05-13T01:30:28+5:302018-05-13T01:31:36+5:30
वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरनगर आहे. येथील जयवंत सिंगच्या घरी राहणारे चरणसिंग विठ्ठलसिंग येवतीकर (वय ३८) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता नीलडोह ग्रामपंचायतजवळच्या मैदानात आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा, असा संशय आहे.
अशाच प्रकारे शुक्रवारी दुपारी २.३० ला गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी कॅन्टीनच्या भिंतीजवळ एक ३० ते ३५ वयोगटातील व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्याची ओळख त्यावेळी पटली नव्हती.
लकडगंजमध्ये शुक्रवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास ४० ते ५० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयोत नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तीनही प्रकरणात अनुक्रमे एमआयडीसी, गणेशपेठ आणि लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, हे तीनही मृत्यू उष्माघातानेच झाले असावेत, असा कयास आहे.