सीबीआयच्या जाळ्यात सापडलेले इंडियन ऑईलचे तीन अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 09:58 PM2022-03-31T21:58:14+5:302022-03-31T21:58:56+5:30
Nagpur News केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या तीन अधिकाऱ्यांना इंडियन ऑईलने निलंबित केले आहे.
नागपूर : प्रत्येकी एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या अधिकाऱ्यांविरोधात चौकशी सुरू असताना इंडियन ऑईलने त्यांना निलंबित केले आहे.
इंडियन ऑईलच्या नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत दोन रिटेल आऊटलेटच्या मालकांनी नोंदविलेल्या तक्रारींवरून सीबीआयने सापळा रचला. या कारवाईदरम्यान आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार, आयओसीएलचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले (किरकोळ विक्री) यांना प्रत्येकी एक लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले. या अधिकाऱ्यांना इंडियन ऑईलने २५ मार्च रोजी निलंबित केले.
या प्रकरणातील तपास प्रक्रियेवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहे. हे अधिकारी दोषी आढळल्यास इंडियन ऑईलच्या नियमांनुसार आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. वस्तुनिष्ठ तपास सुनिश्चित करण्यासाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे इंडियन ऑईलतर्फे स्पष्ट करण्यात आले.