अल्पवयीन मुलासह तीन सराईत मोबाईल चोरटे ताब्यात, १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By योगेश पांडे | Published: July 13, 2023 05:53 PM2023-07-13T17:53:43+5:302023-07-13T17:54:04+5:30
१.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : अल्पवयीन मुलासह तीन सराईत मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.
७ जुलै रोजी मध्यप्रदेशमधील शिवनी येथून नागपुरात खरेदीसाठी आलेले सुनिल झारीया यांना अग्रसेन चौकाजवळ सकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी लुटले होते. त्यांचा मोबाईलदेखील चोरून नेला होता. या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अन्वर अन्सारी उर्फ असरार अन्सारी (२४, अन्सारनगर, मोमीनपुरा) हा सहभागी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. त्याने राजेश लक्ष्मीनारायण कुशवाह (३४, नरसिंहपूर, मध्यप्रदेश) व गार्ड लाईन परिसरातील एका अल्पवयीन मुलासोबत हा गुन्हा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी अन्वरच्या ताब्यातून ११ मोबाईल फोन व अल्पवयीन मुलाकडून एक मोबाईल फोन असा एकूण १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, विनायक कोल्हे, शशिकांत मुसळे, संजय शाहू, संदीप गवळी, अनंत नान्हे, शंभूसिंह किरार, पंकज निकम, पंकज बागडे, कुणाल कोरचे, वैभव कुलसंगे, रोहीदास जाधव, महेंद्र सेलोकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.