व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:23+5:302021-08-27T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती आज सकाळी उघडकीस आली.
शुभम आनंद तिलघरे (वय ३०, रा. वाघधरा) असे मृताचे नाव आहे. त्याला दारू आणि गांजाचे भारी व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना नेहमीच दारू पाजण्यासाठी त्रास देत होता. प्रसंगी हिंसक होऊन मारहाण करत धमकीही द्यायचा. त्याच्या या त्रासाला त्याचे सर्वच मित्र कंटाळले होते. दिवसभर कबाटकष्ट करून रोजी मिळवायची आणि शुभमवर कशाला उडवायची, असे त्यांना वाटत होते. त्याचा नेहमीसाठी बंदोबस्त करायला पाहिजे, असेही त्यांना वाटायचे. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, अशी त्यांची अवस्था होती. त्यामुळे आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा, अरून जसवंत सिंग आणि बबलू रामाधर सलोडिया या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला. नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्री आरोपींच्या मागे दारूसाठी लागला. आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली. नंतर त्याला एका पडक्या शाळेच्या आवारात नेले. तेथे दाट झाडंझुडपं वाढली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिकडे कुणी फिरकत नाही. आरोपींनी शूभमला तिकडे नेले आणि त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले. गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास त्याचा मृतदेह पडून दिसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. माहिती कळताच एमआयडीसीचेे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली. शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांना शोधले आणि गुरुवारी सायंकाळी अटक केली.
---
भाजी कापायचे चाकू विकत घेतले
आरोपींनी शूभमची हत्या करण्यासाठी तीन चाकू २० - २० रुपयांत विकत घेतले. हत्या करताना आरोपींच्या एका चाकूचे पाते वाकले. प्रारंभी त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता. नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असे आरोपींना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याची हत्या केली.
---