नागपुरातील दोन अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:25 AM2019-12-07T00:25:57+5:302019-12-07T00:26:34+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पतीपत्नीसोबत तिघे ठार झाले. तर, सात वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पतीपत्नीसोबत तिघे ठार झाले. तर, सात वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला.
गंगानगर गिट्टीखदान मध्ये राहणारे कपिल बोदेले (वय ३५) त्यांची पत्नी स्वप्ना आणि देवांश (वय ७ वर्षे) तसेच सोनाली (वय ५ वर्षे) या दोघांसह मोटरसायकलवर बसून रात्री ७ च्या सुमारास काटोल नाका मार्गाने जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाचा तीव्र प्रकाशझोत डोळ्यावर आल्याने कपिलने दुचाकीचे करकचून ब्रेक मारले. त्यामुळे चारही जण खाली पडले. गंभीर जखमा झाल्यामुळे कपिल आणि स्वप्नाचा करुण अंत झाला तर देवांश आणि सोनाली जखमी झाल्याचे समजते. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतूकही प्रभावित झाली होती. गिट्टीखदान पोलिसांनी रात्री ११.३० वाजेपर्यंत या संबंधाने माहिती कळविली नाही. पत्रकारांनी वारंवार विचारणा करूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळले. पत्रकारच काय, माहिती कक्षालाही गिट्टीखदान पोलिसांनी माहिती दिली नसल्याचे सांगितले जात होते. अपघाताच्या माहितीसंदर्भातील गिट्टीखदान पोलिसांची ही गोपनीयता अनाकलनीय होती.
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका ७५ वर्षीय वृद्धेचा करुण अंत झाला. जनाबाई बाबूलाल सयाम असे मृत वृद्धेचे नाव आहे. ती कृष्णानगर, सेमिनरी हिल परिसरात राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ती आझादनगर मार्गाने पायी जात होती. भरधाव ट्रकचालकाने वृद्ध सयाम यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. या अपघातामुळे परिसरात काही वेळेसाठी संतप्त वातावरण निर्माण झाले. सूरज सयाम यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक संजय म्हैसकर (वय ४२, रा. सुभाषनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.