वणीजवळ अपघातात तिघे ठार
By admin | Published: June 16, 2017 12:02 AM2017-06-16T00:02:21+5:302017-06-16T00:03:05+5:30
वणीजवळ अपघातात तिघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : अहमदाबाद येथून नगरला जाणाऱ्या बलेनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे कार झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. मृत अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील मनीष भाऊसाहेब गवळी (२३), नवीन बबन कांडेकर (२२), मंगल बबन कांडेकर (४२), आशा रावसाहेब गावडे (४५) आणि छगन माणकू कांडेकर (२५) हे सर्वजण अहमदाबाद येथे नवीन बलेनो कार घेण्यासाठी गेले होते. सैन्य दलात सेवा बजावत असल्याने कारच्या किमतीत सवलत मिळते म्हणून या ठिकाणी ते गेले होते.
कारची डिलीव्हरी घेऊन अहमदाबाद येथून परतीच्या प्रवासास रात्री ९ वाजेच्या सुमारास ते निघाले. सापुतारा मार्गे नाशिककडे जात असताना लखमापुर फाट्यावर पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चालक नवीन बबन कांडेकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील राहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसाना ही बाब कळविण्यात आली. अपघातग्रस्त कारमधून जखमींना बाहेर काढण्यात आले तेव्हा मंगला बबन कांडेकर, आशा रावसाहेब गावडे, छगन माणकू कांडेकर हे तिघे जागीच ठार झाल्याचे आढळून आले. मनीष गवळी व नवीन कांडेकर हे जखमी झाले होते. त्यांना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. मनीष गवळी याना किरकोळ स्वरूपाचा मार लागला तर नवीन कांडेकर यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो मेलवर (१५ वणी अॅक्सिडेंट)
अपघाताने कारची झालेली भीषण दुरवस्था.