मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 09:07 PM2019-07-12T21:07:45+5:302019-07-12T21:15:59+5:30

मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

Three laborers die under the debris of soil | मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील कन्हान एमआयडीसी परिसरातील दुर्दैवी घटनाअवैध खोदकाम कारणीभूत : आराम करीत असताना कोसळला सुळका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कन्हान) : मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्याने तणाव निवळला. 


मृतांमध्ये शिवकुमार नागमन मनहने (४०), गंगाप्रसाद रघू जलघरे (४५) व कन्हैयालाल रामकेवल चंदन (२५) तिघेही रा. फुकटनगर, कन्हान, ता. पारशिवनी या तिघांचा समावेश आहे. कन्हान शहरालगत असलेल्या एमआयडीसीच्या जागेवर काही वर्षापासून मातीचे अवैध खोदकाम केले आहे. या तिघांसह सुरेश दखन कनोजिया (२२, रा. फुकटनगर, कन्हान, ता. पारशिवनी) हा माती खोदकामासाठी गेला होता. या चौघांनीही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत माती भरली. त्यानंतर तिघेही खोदकाम केलेल्या जागेवर सुळक्याच्या खाली आराम करण्यासाठी बसले.
दरम्यान, सुळका कोसळला आणि तिघेही मातीच्या ढिगाऱ्यात दबल्या गेले. माहिती मिळताच जिल्हा परिषसदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, वेकोलिच्या एचएमएस कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांच्यासह वेकोलिचे अधिकारी, पोलीस व नागरिक घटनास्थळी दाखल झाले. वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने तिघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. त्याचवेळी नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी रेटून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शरद डोणेकर व शिवकुमार यादव यांनी मध्यस्थी केल्याने वेकोलि प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे तणाव निवळला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी सुरेश कनोजिया याच्या तक्रारीवरून अकसमात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
जीवघेणे अवैध धंदे
कन्हान परिसरात चोरी व अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गोंडेगाव येथील कोळसा खाण बंद करण्यात आली असून, त्या परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरून नेला जातो. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रितेश भीमराव चवरे (२५, रा. रमानगर, कामठी) व सतीश केशवराव देशमुख (३५, रा. बीबीनगर, कॉलनी, कामठी) हे कोळसा चोरून नेत असताना मोठा दगड कोसळला. त्याखाली दबून दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चोरी व अवैध धंदे जीवघेणे ठरत असले तरीही ते करण्याची हिंमत केली जात आहे.
प्रशासनाचा कानाडोळा
या भागात काही वर्षांपासून मातीचे अवैध खोदकाम केले जात आहे. ती जागा एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असली तरी तिथे कोणतेही छोटेमोठे उद्योग नसल्याने ती ओसाड आहे. चोरट्यांनी त्या जागेवरील माती खोदून न्यायला सुरुवात केली. या खोदकामात तिथे मातीचे सुळके तयार झाले. दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाली. त्यामुळे सैल झालेला सुळका कोसळला आणि तिघांना त्यांचे प्राण गमवावे लागले. ही मातीचोरी प्रशासनाला माहिती असूनही कुठलीही उपाययोजना केली जात नाही.

या ठिकाणी मातीचे अवैध खोदकाम केले जाते. मध्यंतरी रेतीसोबतच येथील माती चोरट्यांवर कारवाई करून त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला होता. चोरटे येथे रात्रभर मातीचे खोदकाम करतात. या भागात रेतीचोरीचे प्रमाण अधिक असल्याने माती चोरट्यांवर कारवाई करणे कठीण जाते. या घटनेतील माती चोरट्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
 वरूणकुमार सहारे,
तहसीलदार, पारशिवनी.

Web Title: Three laborers die under the debris of soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.