नोकरीच्या नावावर तीन लाखाची फसवणूक
By admin | Published: January 18, 2016 02:48 AM2016-01-18T02:48:26+5:302016-01-18T02:48:26+5:30
एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जरीपटका येथील एका तरुणाला तीन लाख रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मोठ्या कंपनीचे दिले नियुक्ती पत्र : भाऊ व आईच्या
खात्यात जमा करायला लावले पैसे
नागपूर : एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जरीपटका येथील एका तरुणाला तीन लाख रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील आठ महिन्यांपासून नोकरी न लागल्याने आणि तीन लाख रुपयेसुद्धा परत न मिळाल्यामुळे पीडित तरुणाने पोलीस उपायुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केली.
मंगेश नागदेवे असे पीडित तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात त्याने जरीपटका पोलीस ठाण्यात लिखित तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपी चेतनला ठाण्यात बोलावून साधी विचारपूससुद्धा केलेली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी तो गेल्या १० दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तक्रारकर्त्या मंगेशने दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवक चेतनचे वडील दिलीप हे पोलीस विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे आरोपी चेतनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मंगेशने सांगितले की, त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून तो आरोपी चेतन (३२) रा. सुगतनगर चौक याला ओळखत होता. एप्रिल २०१५ मध्ये चेतनने मंगेशला सांगितले की, त्याची एका मोठ्या कंपनीतील अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. त्यामुळे तो कुणालाही नोकरी लावून देऊ शकतो. त्यामुळे मंगेशचा लहान भाऊ निशांतला नोकरी लावून देण्याचे आमिषही त्याने दाखविले.
२६ मे २०१५ रोजी कंपनीचे नियुक्ती पत्र त्याच्या हाती दिले आणि २५ जून २०१५ रोजी कंपनीच्या चेन्नई येथील मुख्यालयात मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. तसेच सत्यजित सपकाळ हे मुख्यालयाचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला आणि तीन लाख रुपयाची मागणी केली. ही रक्कम मंगेशने आरोपी चेतनची आई व लहान भावाच्या खात्यात जमा केली.
२४ जून रोजी मुलाखत होणार होती. तो दिवस निघून गेला. तेव्हा आरोपीने २५ जुलै रोजी मुलाखतीसाठी चेन्नईला बोलावल्याचे सांगितले. आरोपी जुलै ते आॅगस्ट २०१५ पर्यंत टाळाटाळ करू लागला.
शेवटी मंगेश चेतनच्या घरी जाऊन पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे चेतनने धनादेश दिला. परंतु तो बाऊन्स झाला. त्यानंतर अनेकदा त्याने चेक दिले, परंतु ते सर्व बाऊन्स झाले. १३ आॅक्टोबर २०१५ रोजी ७३ हजार रुपये रोख परत केली आणि उर्वरित सव्वादोन लाख रुपये लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु अजूनपर्यंत पैसे परत केले नाही. (प्रतिनिधी)