हिंगणा मार्गावर धावण्यासाठी चीनमधून आल्या तीन मेट्रो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 09:23 PM2019-08-26T21:23:54+5:302019-08-26T21:24:49+5:30
लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत. उर्वरित दोन रेल्वेगाड्याही लवकरच येणार आहेत.
गेल्या १५ ऑगस्ट रोजी हिंगणा मार्गावर मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर आता लवकरच एक्वा लाईन सुरू करण्यासाठी महा मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहते. सीआरसीसीच्या दालियन प्लांट येथून ५ मेट्रो ट्रेन भारतात पोहोचल्या. त्यापैकी २५ ऑगस्टच्या मध्यरात्री ३ मेट्रो ट्रेन नागपूरला पोहोचल्या. त्यामधील २ मेट्रो कोचेस हे हिंगणा डेपो आणि १ मिहान डेपो येथे ठेवण्यात आली आहे. सध्या इंटरचेंज स्टेशनवरून खापरीपर्यंत मेट्रोची सेवा सुरू आहे. तर याच मेट्रो स्टेशनवरून लोकमान्यनगरपर्यंत एक्वा लाईन सुरू करण्यात येणार आहे.
हिंगणा आणि मिहान डेपो येथे या कोचेसची असेम्बलिंग पूर्ण करण्यात आली असून, ते धावण्यासाठी सज्ज करण्यात येत आहे. सदर कोचेस हे चीनमधील दालियान येथून समुद्री मार्गाने भारतात चेन्नईच्या बंदरावर आणण्यात आले. दालियान येथून ते ४ जुलैला निघाले व १२ ऑगस्ट २०१९ रोजी चेन्नई येथे पोहोचले. कोचेसला चेन्नई येथून ट्रान्सपोर्टच्या माध्यमाने १७ ऑगस्टच्या रात्री नागपूरकरिता रवाना करण्यात आले. हे ट्रेलर २५ ऑगस्ट २०१९ च्या मध्यरात्री नागपूर येथे पोहचले.
याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फीचर हे अत्याधुनिक सर्वसुविधायुक्त असून, आता लवकरच शहरामध्ये मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे. या कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आहेत.