नागपुरात कडवविरुद्ध आणखी तीन तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:35 AM2020-07-14T00:35:50+5:302020-07-14T00:37:43+5:30
गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचारपूस केली. उद्या आणखी काही जण गुन्हे शाखेत हजेरी लावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचारपूस केली. उद्या आणखी काही जण गुन्हे शाखेत हजेरी लावणार आहेत.
मंगेश कडवच्या भरतनगरातील कार्यालयात पोलिसांना दोन पोती कागदपत्रे आणि फाईल्स मिळाल्या. त्यात कडवच्या संपर्कातील अनेकांची नावे आहेत. काही स्टॅम्पवर लिहिलेल्या करारनाम्यात कडवचे भागीदार म्हणून काही व्यक्तींची नावे आहेत. अशा तिघांना आज गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत चौकशी केली. या चौकशीतून काय पुढे आले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या तिघांना आणि आणखी काही जणांना मंगळवारी पोलिसांनी गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलाविल्याची सूत्रांची माहिती आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांची आज चौकशी झाली त्यातील तिघांनीही त्याच्यासोबत भागीदारी असल्याचा इन्कार केला. उलट कडवने आमच्यासोबतही फसवणूक केल्याचा आरोप लावल्याची माहिती आहे.
आमची रक्कम हडप केली आणि परत मागितल्यानंतर आम्हालाही धमक्या दिल्या, असे या तिघांनी म्हटल्याचे समजते. पोलीस या तिघांच्या बयानाची शहानिशा करीत आहेत.
दरम्यान, आज आणखी तिघे तक्रारदार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे आले. आमचीही कडवने फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी गुन्हे शाखेत केल्याचे समजते. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांना परिमंडळ-१च्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
आणखी होणार गुन्हे दाखल
कडव याने शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. त्यातील सहा तक्रारींची शहानिशा झाली. त्यामुळे सहा गुन्हे दाखल झाले असून, लवकरच आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.