नागपुरात आढळले ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 10:15 AM2022-01-24T10:15:57+5:302022-01-24T10:23:55+5:30
नीरीतर्फे १७ ते २१ जानेवारीदरम्यान ८९ नमुने विविध भागांतून गोळा करण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांंच्या नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले.
राजीव सिंह
नागपूर : कोरोनाच्या विषाणूचे सातत्याने म्युटेशन होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात संसर्गाचा वेग वाढविला असून नीरीतदेखील जीनोम सिक्वेन्सिंग सुरू आहे. चौथ्या टप्प्यात ८९ नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. यातील सर्वच नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला. आश्चर्याची बाब म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्येदेखील म्युटेशन होत असल्याचे दिसून आले. विषाणूतील हा बदल नेमका कशा पद्धतीने प्रभाव टाकेल, याबाबत नीरीचे वैज्ञानिक सध्या बोलण्यास तयार नाहीत.
नीरीत आतापर्यंत कोरोनाच्या २९० नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग झाले आहे. चौथ्या टप्प्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये म्युटेशन आढळले आहे. प्राथमिक पातळीवर तपासणी सुरू असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये तीन प्रकारचे म्युटेशन नोंदविण्यात आले आहेत. यात बी.१.१.५२९, बीए १ आणि बीए २ चा समावेश आहे.
ज्या ८९ नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग झाले त्यातील ६६.२ टक्के नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचा बीए २ हा प्रकार आढळला. ३१.५ टक्क्यांमध्ये बी.१.१.५२९ आणि २.३ टक्क्यांमध्ये बीए १ हा प्रकार आढळला. ज्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग झाले, त्यात सगळ्यात लक्षणे दिसून आली. आयसीयूत दाखल असलेल्या सहा रुग्णांच्या नमुन्यांचेदेखील जीनोम सिक्वेन्सिंग झाले. यातील पाच जणांत बी.१.१.५२९ आणि एकात बीए २ प्रकारचे म्युटेशन आढळले.
नीरीतर्फे १७ ते २१ जानेवारीदरम्यान ८९ नमुने विविध भागांतून गोळा करण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांंच्या नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले.