साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन नवे प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:17 AM2019-04-29T11:17:32+5:302019-04-29T11:17:55+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे.

Three new representatives of Vidarbha on Sahitya Mahamandal | साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन नवे प्रतिनिधी

साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन नवे प्रतिनिधी

Next
ठळक मुद्देविलास मानेकर, प्रदीप दाते, गजानन नारे यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. रविवारी वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
वि.सा. संघाच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नव्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी साहित्य संघाच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचा विदर्भातील तीन वर्षाचा कार्यकाळ ३१ मार्चला पूर्ण झाला. सोबत महामंडळावर असलेल्या विदर्भाच्या पूर्वीच्या प्रतिनिधींचा कार्यकाळही संपला आहे.
१ एप्रिलपासून महामंडळाचे कार्यालय औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या संस्थेकडे राहणार आहे. याबाबत माहिती देताना म्हैसाळकर यांनी सांगितले की, या तीन पदाधिकाऱ्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळातर्फे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापासून महामंडळाच्या बैठका, धोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रमांमध्ये विदर्भ संघाची भूमिका मांडण्यात या तीन प्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विलास मानेकर हे सध्या वि.सा. संघाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. साहित्य संघाच्या विविध कार्यात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
डॉ. गजानन नारे हे वि.सा. संघाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून विदर्भाच्या कार्यकारिणीचे सभासद आहेत. त्यांच्याच पुढाकाराने २०१७-१८ मध्ये बाल साहित्य संमेलनाचे देखणे आणि यशस्वी आयोजन अकोला येथे करण्यात आले होते. विदर्भ संघाच्या कार्यात सक्रिय सभासद म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे डॉ. नारे यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासाचे उद्देश ठेवून अकोला येथे प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कूलची स्थापना केली. अत्यंत कमी खर्चात सीबीएससी अभ्यासक्रमासह मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावे अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली असून आज या शाळेमध्ये ४५०० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची सर्वत्र चर्चा केली जाते.
महामंडळाच्या कार्यात त्यांची सक्रियता निश्चितच प्रभावी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. महामंडळावर वर्णी लागलेले तिसरे प्रतिनिधी प्रदीप दाते हे वर्धा शाखेचे सचिव आणि गेल्या १० वर्षांपासून वि.सा. संघाच्या कार्यकारिणीचे सक्रिय सभासद आहेत. विदर्भाच्या शाखा समन्वय समितीचे ते निमंत्रक असून ६५ शाखांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
शाखांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे, साहित्यिकांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. यापूर्वी पुण्याला महामंडळ असताना कार्यकारिणीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे.

Web Title: Three new representatives of Vidarbha on Sahitya Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.