५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:29 PM2022-05-04T17:29:52+5:302022-05-04T17:58:43+5:30
८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
नागपूर : थकीत बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जलसंधारण विभागातील तीन बड्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.
कविजीत पाटील (३२), जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि कार्यवाहक प्रादेशिक संवर्धन अधिकारी (नागपूर), श्रावण शेंडे (४६), उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी वर्ग-१ (चंद्रपूर) आणि रोहित गौतम (वय-३५) विभागीय लेखा अधिकारी (चंद्रपूर) अशी आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार नागपूरच्या ४६ वर्षीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले होते. व त्याच्या देयकांची बिले सादर केली होती. सदर कामाच्या बिलाची व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरता तिन्ही अधिकाऱ्यांनी ८१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० लाख देण्याचे ठरले. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
यानंतर मंगळवारी सापळा रचून शेंडे याला तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडण्यात आले. पाटील आणि गौतम यांच्यावतीने शेंडे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.