विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी तीन जागांचा पर्याय; येत्या बैठकीत होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 02:16 PM2022-09-26T14:16:40+5:302022-09-26T14:19:57+5:30
प्रशासन करणार प्रस्ताव तयार
नागपूर :विधान भवनाची जागा अपुरी पडत असल्याने लगतची जागा अधिग्रहित करण्याची गरज असल्याचे सूतोवाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. विधान भवनाच्या अगदी समोरील निर्माणाधीन इमारत अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जुनाच आहे. लगतच शासकीय इमारतीसह इतरही एका जागेचासुद्धा विचार होत असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते.
नागपूरच्या विधान भवनात सेंट्रल हॉलची गरज आहे. विधान भवन परिसरात जागेची कमी आहे. नवीन बांधकाम करण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याने आजूबाजूची जागा अधिग्रहित करणे गरजेचे असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. विधान भवन परिसरात नवीन बांधकाम करण्यासाठी समोरील निर्माणाधीन इमारतीची जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव तसा जुना आहे. या इमारतीत कार्यालय तयार करून विधान भवनापर्यंत भूमिगत मार्ग तयार करण्याची चर्चा होती; परंतु संबंधित इमारत मालकाने याला विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नवीन जागा अधिग्रहित करण्यावरही प्रशासनाकडून विचार होत असल्याची चर्चा आहे. बाजूला एक शासकीय इमारत आहे. तसेच जवळच पुन्हा एक शासकीय इमारत आहे. विधान भवन परिसराचा विस्तार करण्यासाठी या सर्व जागेबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.
यासोबतच झिरो माईलजवळ बनत असलेल्या मेट्रोच्या इमारतीचे काही मजले घेण्याचा प्रस्तावही मध्यंतरी आला होता. या सर्व पर्यायांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच विधिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर चर्चा होणार असून तसा प्रस्ताव प्रशासनास तयार करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बैठक होण्याची शक्यता असून याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता प्रशासनाच्या प्रस्तावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
द्यावा लागणार मोबदला
जागा अधिग्रहित केल्यास संबंधित मालकास मोबदला द्यावा लागणार आहे. मोबदल्याची रक्कमही शेकडो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एवढा निधीही सरकारला द्यावा लागेल.