ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने तीन रुग्णांचा मृत्यू, नागपूर मेडिकलमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:11+5:302021-01-18T04:14:37+5:30
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद ...
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागोमाग एक तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तूर्तास मेडिकल प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवरत्न शेंडे (वय ५६, रा. सिद्धार्थनगर कोरोडी), अमोल नाहे (२४, रा. संग्रामपूर, बुलडाणा) व नरेश मून (६३, रा. महादुला) अशी मृत रुग्णांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमोल नाहे या युवकाला शुक्रवारी सकाळी, शिवरत्न शेंडे यांना शनिवारी सायंकाळी, तर नरेश मून या वृद्धाला रविवारी पहाटे ३ वाजता भरती करण्यात आले होते. कोरोना संशयित म्हणून तिघांवर उपचार सुरू होते. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. तिघांनाही ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ‘आयसीयू-१’मधील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे तिन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. अचानक रुग्णांच्या मृत्यूने गोंधळ उडाला. याची माहिती वरिष्ठांना मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्ती करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. ऑक्सिजन पुरवठा अर्ध्या तासापर्यंत खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शनिवारी झाली होती ऑक्सिजनची गळती
शनिवारी ट्रॉमा केअर सेंटरच्या ‘आयसीयू’मध्ये ऑक्सिजनच्या पाईपलाईनमधून गळती झाली होती. एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. यामुळे मोठा धोका टळल्याचे सूत्राने सांगितले.
प्रकरणाची चौकशी केली जाईल
ट्रॉमा केअर सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा अद्ययावत प्रणालीने होतो. रविवारी पहाटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचा रिपोर्ट नाही; परंतु यादरम्यान काही वेळेसाठी पुरवठा कमी-जास्त झाल्याची नोंद आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर होती. एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याने त्याचा संबंध ऑक्सिजन खंडित झाल्याशी लावणे चुकीचे आहे. कुणाची तक्रार नसली तरी या घटनेची चौकशी केली जाईल.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.