प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना कारावास
By admin | Published: March 30, 2017 02:47 AM2017-03-30T02:47:37+5:302017-03-30T02:47:37+5:30
गोंदिया-दुर्ग रेल्वेस्थानक दरम्यान अजमेर पुरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर हल्ला करून लुटणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी
पुरी एक्स्प्रेस : गोंदिया-दुर्ग दरम्यान घडला होता थरार
नागपूर : गोंदिया-दुर्ग रेल्वेस्थानक दरम्यान अजमेर पुरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर हल्ला करून लुटणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एन. फड यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम पीडित प्रवाशांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
सौरभ चंद्रकांत बुरांडे (२४) रा. नवापारा, अनिल ऊर्फ गोलू जीवन सिन्हा (२२)रा. रायपूर डगनिया आणि शत्रुघ्न ऊर्फ महेश नरोत्तम तांडी (२८) रा. मोवा रायपूर, अशी आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, ओडिशा राज्याच्या मयूरभंज येथील रहिवासी बुधियासिंग, प्रदीपसिंग, रंजितसिंग, पप्पूसिंग, लेडूसिंग आणि शैलूसिंग हे रोजगारासाठी अहमदाबाद येथे गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या ठेकेदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम घेऊन ते ३० जुलै २०१६ रोजी अहमदाबादहून आपल्या गावाकडे जाण्यासाठी अजमेर पुरी एक्स्प्रेसने निघाले होते. बोगी रिकामी असल्याने हे सर्व मजूर मिळेल त्या बर्थवर झोपलेले होते.
मात्र रंजितसिंग हा जागा होता आणि बॅगांवर लक्ष ठेवून होता. ३१ जुलै रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही एक्स्प्रेस गोंदिया रेल्वेस्थानकावर थांबली होती. त्याच वेळी चार अनोळखी इसम बोगीत शिरले होते. ही एक्स्प्रेस गोंदियाहून पुढील प्रवासासाठी निघाली असता लुटारूंनी सर्वांना मारहाण करायला सुरुवात केली होती.
लुटारूंनी त्यांच्यावर ब्लेडने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्याजवळील तीन बॅग, दोन मोबाईल, असा एकूण ५१ हजारांचा ऐवज लुटला होता. बोगीतील धोक्याची साखळी ओढून सर्व लुटारू अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेची तक्रार पीडित प्रवाशांनी दुर्ग रेल्वेस्थानक पोलिसांकडे केली होती. याच ठिकाणी जखमी प्रवाशांवर तेथील इस्पितळात उपचार करण्यात आले होते. हा गुन्हा गोंदियाच्या हद्दीत घडल्याने तो गोंदिया रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध भादंविच्या ३९४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
गोंदिया रेल्वेस्थानक पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजयसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी तपास करून या तीन लुटारूंना अटक केली होती. एक लुटारू अद्यापही गवसला नाही. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील क्रांती नेवारे यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. अश्विन वासनिक यांनी काम पाहिले. कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, अनिल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अजय चरडे, गजेंद्र वाटमोडे, सुभाष मडावी, राहुल रेवतकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)