नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 08:25 PM2022-08-03T20:25:57+5:302022-08-03T20:26:38+5:30
Nagpur News नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
मृतांमध्ये शेतकरी महिलेचा समावेश, एक जखमी
नागपूर / चंद्रपूर : नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी शिवारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. यासोबतच जिवती तालुक्यातील शेडवाही शिवारातही वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनवरी (पादरी खापा) शिवारात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळल्याने होरपळून उज्ज्वला सुरेश थुटूरकर (४०, रा. सातनवरी, ता. नागपूर, ग्रामीण) या महिलेचा मृत्यू झाला.
थुटूरकर कुटुंबीय शेतात असलेल्या घरी वास्तव्यास हाेते. उज्ज्वला या आपल्या शेतात काम करीत हाेत्या तर कुटुंबातील इतर सदस्य घरीच असल्याने ते बचावले. या घटनेबाबत हिंगणा पाेलीस, तहसीलदार, तलाठी यांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शेतकरी महिलेचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शाेककळा पसरली आहे. ही घटना समजताच नागरिकांनी माेठी गर्दी केली होती. पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सातनवरीचे सरपंच विजय चाैधरी, शिरपूर - भुयारीचे माजी सरपंच गाैरीशंकर गजभिये, धामणाच्या सरपंच वंदना थुटूरकर, उपसरपंच मनाेहर येलेकर यांनी घटनास्थळ गाठून मृत महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन घटना...
भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या चिचोर्डी शेतशिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक आलेल्या पावसात वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय काशिनाथ चालखुरे (५५, रा. बरांज, मोकासा) असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. विकास डाखरे (३०, रा. बरांज, मोकासा) असे जखमीचे नाव आहे.
दरम्यान, जिवती तालुक्यातील शेडवाही (लांबोरी) येथील तरुण शेतकरी अनिल सोयाम या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना शेडवाही शिवारात घडली. तेथे असलेल्या त्यांच्या सात शेळ्याही ठार झाल्या. घटनेचा पंचनामा तलाठी निशांत मालेकर यांनी केला आहे.