एकाच कुटुंबातील तीन जण विहिरीत पडले; मानकापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 02:55 PM2017-08-31T14:55:58+5:302017-08-31T14:57:03+5:30
घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.
नागपूर, दि.31- घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकून पडले. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौघांना बाहेर काढण्यात आले. पण मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू आहेत.
गायत्रीनगर झिंगाबाई टाकळीत राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून सुधीर चौधरी यांचा परिवार भाड्याने राहतो. घराच्या अंगणात विहिर आहे. सुधीर यांची पत्नी सुरेखा, सुरेखांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) आणि दोन वर्षांचा चिमुकला अंकुश या विहिरीजवळ बसून होते. जमीन पावसामुळे भुसभुशीत झाली असल्यामुळे अचानक ही जमीन खाली गेली. त्यामुळे अंगणात (विहिरीच्या बाजुला) गप्पा करीत असलेल्या सुरेखा, मंदाताई आणि अंकुश विहिरीत पडले. मोठा आवाज आल्यामुळे घरात बसलेले सुधीर चौधरी आणि त्यांचे वडील यादवराव चौधरी (वय ७०) धावले. त्यांना पोहणे येत असल्यामुळे त्यांनी सुरेखा आणि मंदाताई यांना बाहेर काढले. चिमुकला अंकूश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. विहिरीच्या आजुबाजूची जमिन पोकळ असल्यामुळे अंकूशला शोधण्याच्या प्रयत्नात सुधीर आणि त्यांचे वडीलही चिखलात फसले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. कर्णोपकर्णी वा-यासारखी या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविले. अग्निशमन दलाचा ताफा आणि मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले. दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुनील चौधरी व त्यांच्या वडिलांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, सुरेखा आणि मंदाताई यांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, चिमुकल्या अंकुशचा शोध घेणे सुरू होते. त्याला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबाही बाहेर फेकण्यात आला. मात्र, अंकुश हाती लागला नव्हता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.