दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:13 AM2019-05-09T10:13:51+5:302019-05-09T10:16:00+5:30
राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कलेची तिसरी (प्रवेशिका पूर्ण) व पाचवी (मध्यमा पूर्ण) या दोन्ही किंवा या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये तीन टक्के अतिरिक्त गुण मिळणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे तीन टक्के गुण बुडणार आहेत.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी या शासन निर्णयाचे मंडळाद्वारे पालन केले जात असून त्यानुसार इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंडळाचे अधिकारी स्वत:ला या वादापासून दूर ठेवून सर्व जबाबदारी सरकारवर ढकलत आहेत.
परंतु, अधिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकार व मंडळ यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे कळले. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी मंडळाच्या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सरकारची री ओढत सकारात्मक अहवाल दिला. असे असले तरी, मंडळाचे अधिकारी सुरुवातीला सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे सांगत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मंडळाच्या तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला होता हे मान्य केले. असा अन्यायकारक निर्णय घेण्याचे कारण विचारले असता कुणीच तोंड उघडले नाही. इयत्ता सातवीपूर्वीचे विद्यार्थी समजदार नसतात. परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे ते परीक्षेला बसतात. त्यांच्यासोबत अशी बळजबरी होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, संबंधित विषयाचे शिक्षकांना मंडळाचा हा युक्तिवाद मान्य नाही. संबंधित कलेत परिपक्व होतपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत बसवले जात नाही असे त्यांनी सांगितले व सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.
आरक्षित जागांवर प्रवेश नाही
२०१० मधील शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीमध्ये २ ते ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. शास्त्रीय कलेच्या अतिरिक्त गुणासाठी अपात्र ठरणाºया विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. गेल्यावर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.