नागपुरात एकाकी महिलेवर १० दिवसांत तिघांचा पाशवी बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:11 PM2019-03-22T22:11:09+5:302019-03-22T22:11:42+5:30
एकाकी, निराधार महिलेवर १० दिवसांत तिघांनी पाशवी बलात्कार केला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ भागात एका झोपडपट्टीत १० ते २० मार्च दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाकी, निराधार महिलेवर १० दिवसांत तिघांनी पाशवी बलात्कार केला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ भागात एका झोपडपट्टीत १० ते २० मार्च दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.
तक्रार करणारी महिला ३० वर्षांची आहे. ती मूळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. पतीशी पटत नसल्याने ती रागाच्या भरात काही दिवसांपूर्वी नागपुरात आली. येथे ती आधी महाराजबागमध्ये साफसफाईचे काम करायची. आजूबाजूला काम करणाऱ्या मध्य प्रदेशातीलच एका तरुणाशी तेथे तिची ओळख झाली. त्यांच्यात नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून तरुणाने धरमपेठमधील एका झोपडपट्टीत खोली भाड्याने घेतली. या खोलीत हे दोघे लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोन आठवड्यांपूर्वी तो तरुण होळीच्या निमित्ताने त्याच्या मूळगावी मध्य प्रदेशात गेला. त्यामुळे ही महिला एकटीच तिच्या झोपडीत राहू लागली. ते लक्षात आल्याने १० मार्चला दुपारी १२ च्या सुमारास पंडित नावाचा एक ट्रकचालक तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा प्रकार पीडित महिलेने शेजारच्या महिलेला सांगितली. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पीडित महिला गप्प बसली. १८ मार्चला सदर महिला सीताबर्डीत गेली होती. मध्यरात्री ती एका ऑटोत घरी परतली. यावेळी रस्त्यात आकाश नामक ऑटोचालकाला तिने पती घरी नसल्याने एकटीच घरी राहत असल्याचे सांगितले. तिला घरी सोडून आरोपी त्यावेळी निघून गेला. १ वाजताच्या सुमारास तो तिच्या घरात परत आला अन् त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा प्रकार वस्तीतील मंगल नामक एकाने बघितला. महिला घरी एकटीच आहे, तिच्याकडे वेगवेगळे तरुण येऊन शरीरसंबंध जोडतात, हे पाहून मंगलने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने १९ मार्चच्या रात्री नकार दिल्याने आरोपीने तिला पैश्याचे आमिष दाखवले. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २० तारखेच्या रात्री आरोपी मंगल तिच्या घरासमोर घुटमळू लागला. ते पाहून महिलेने शेजारच्यांना हा प्रकार सांगितला.
शेजारच्या धावल्या मदतीला
एकाकी असल्याचे पाहून वस्तीतील दोघे आणि एक ऑटोचालक अशा तिघांनी दहा दिवसांत तीनवेळा अत्याचार केल्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेली महिला धुळवडीच्या सकाळपासून आपल्या झोपड्यासमोर रडत बसली. शेजाऱ्यांनी तिला विचारणा केली असता तिने त्यांना गुरुवारी सकाळी आपली कैफियत ऐकवली. त्यामुळे शेजारच्या महिलांनी तिला धीर देत सीताबर्डी ठाण्यात नेले. तेथे पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर डब्ल्यूपीएसआय राऊत यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी मंगल राव (वय २४) याला अटक करण्यात आली. अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.