नागपुरात तीन पिस्तूल आणि पाच काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:07 PM2018-03-22T23:07:37+5:302018-03-22T23:07:48+5:30
तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद शफिक अन्सारी (वय ३४, रा. शिवशक्तीनगर), आसिफ अहमद शमसुद्दीन अहमद (वय ३८, रा. योगी अरविंदनगर) आणि राजा उर्फ मोहम्मद शाहरुख खान मोहम्मद इकबाल (वय २४, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक मंगळवारी रात्री यशोधरानगरातील मोहम्मद रफी चौक परिसरात गस्त करीत होते. त्यांना नासुप्रच्या मैदानाजवळ मोहम्मद शफिक आणि आसिफ अहमद संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतूस आढळली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करून पीसीआर मिळवला असता आरोपींनी हे पिस्तूल आणि काडतुसं हसनबागमध्ये राहणारा राजा ऊर्फ शाहरूख खानकडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारी राजालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांना पुन्हा एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं मिळाली. आपण हे पिस्तूल आणि काडतूस बाहेरच्या राज्यातून विकत आणल्याचे राजाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस पथक पिस्तूल तसेच काडतुसाच्या तस्करीत गुंतलेल्यांचा छडा लावण्यासाठी बाहेरच्या राज्यात जाणार आहे.
आरोपी कुख्यात गुन्हेगार
आरोपी राजा ऊर्फ शाहरूख हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने गेल्या वर्षी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून खळबळ उडवून दिली होती. आररोपी शफिक याच्यावरही गुन्हे दाखल आहेत तर आसिफ हॉटेल चालवतो. आसिफ आणि शफीक हे दोघे जनावरांच्या खरेदी विक्रीतही सहभागी आहेत. त्यांना अटक करण्याची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर, ज्ञानेश्वर भेदोडकर, हवलदार राजेश क्षीरसागर, दया बिसांद्रे, शैलेश पाटील, रफिक खान, अरुण धर्मे, राजेश ठाकूर यांनी बजावली.