नागपुरात कुख्यात गुन्हेगाराकडून तीन पिस्तुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:51 AM2019-10-01T00:51:08+5:302019-10-01T00:51:47+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्या कडून दोन विदेशी बनावटीचे पिस्तुल, जीवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्या कडून दोन विदेशी बनावटीचे पिस्तुल, जीवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केल्या. फिरोज उर्फ हाजी खान मोहम्मद जाबिर (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो मोमिनपु-याजवळच्या अंसारनगरात (बोरियापुरा) राहतो.
फिरोज कुख्यात गुंड असून, तो आणि त्याच्या ११ साथीदारांनी दोन वर्षांपूर्वी लातूरजवळ एका खासगी प्रवासी बसमध्ये दरोडा घातला होता. गुजरातच्या एका व्यापा-याची रोख आणि मौल्यवान चिजवस्तूंसह पावणेपाच लाखांचा ऐवज आरोपींनी लुटला होता. या गुन्ह्यात ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली तर फिरोजसह ६ आरोपी फरार होते. तो बोरियापुरात पानटपरीच्या आडून अवैध धंदे आणि गुन्हेगारीत सक्रीय होता. शस्त्र तस्करीतही त्याचे नाव येत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी फिरोजला बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्याकडून दोन विदेशी पिस्तुल, एक देशी पिस्तुल, दोन मॅगझीन आणि जीवंत काडतूस जप्त करून रविवारी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बजाजनगरात गुन्हा दाखल करून त्याचा पीसीआर मिळवला.
आरोपी फिरोज हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण आणि खंडणी वसुलीचाही गुन्हा दाखल आहे. परिसरातील काही कुख्यात गुंडांसोबत त्याचे शत्रूत्व सुरू आहे. असे असूनही फरारीच्या काळात तो बिनधास्तपणे नागपुरात फिरत होता.
साथीदार सतर्क
फिरोजला अटक करताच त्याचे साथीदार सतर्क झाले. त्यांनी त्यांच्याजवळचे शस्त्र ईकडे तिकडे लपविले. पोलिसांनी फिरोजच्या सांगण्यावरून काही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहीही हाती लागले नाही. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी,मयूर चौरसिया, हवलदार शंकर शुक्ला, राजेश टेनगुरिया, प्रमोद ठाकूर, सुरेंद्र पांडे, रवींद्र गावंडे, नायक नरेंद्र ठाकूर, पंकज लांडे, शिपायी प्रविण रोडे, हर्षल पाटमासे, सागर ठाकरे, रोहित काळे, कुणाल मसराम, योगेश सेलूकर आणि देवीप्रसाद दुबे यांनी ही कामगिरी बजावली.