नागपुरातील तीन परिसर सील; दोन परिसर मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:44 PM2020-07-01T22:44:07+5:302020-07-01T22:45:22+5:30
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले.
गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ व ९ येथील भानखेडा व टिमकी (पावटी मंदिर) हे परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. नव्या प्रतिबंधित क्षेत्रात धंतोली झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३५ येथील रेणुकानगरी, गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ येथील परदेशी तेलीपुरा व याच झोनअंतर्गत प्रभाग ८ येथील डोबीनगर या परिसरात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर हे परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. उपरोक्त परिसरामध्ये कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर शहरातील इतरत्र हा संसर्ग पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून परिसर सील करण्यात आले आहेत. प्रतिबंधित या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, अँम्ब्युलन्स आदींना आदेशातून वगळण्यात आले आहे.
नव्याने प्रतिबंधित क्षेत्र
नव्या प्रतिबंधित क्षेत्रात अनुक्रमे रेणुकानगरी येथील उत्तर-पूर्वेस वांदिले यांचे घर, उत्तर-पश्चिमेस अनिल बंबावाले यांचे घर, दक्षिण-पश्चिमेस प्रभाकर गायकवाड यांचे घर, दक्षिण-पूर्वेस यासटवार यांचे घर. परदेशी तेलीपुरा येथील दक्षिण-पूर्वेस एन.एस.फास्ट फूड, उत्तर-पूर्वेस वर्मा बिल्डिंग, उत्तर-पश्चिमेस अनुष्का ब्युटी पार्लर आणि दक्षिण-पश्चिमेस उमरेठे यांचे घर. याच झोनअंतर्गत प्रभाग ८ येथील डोबीनगर येथील उत्तर-पश्चिमेस निसार भाई यांचे घर, उत्तर-पूर्वेस बब्बू पानठेला व उत्तरेस डेड गल्लीचा समावेश आहे.