सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पीजीच्या वाढल्या तीन जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:05 PM2020-02-13T23:05:41+5:302020-02-13T23:07:02+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या. यात ‘डॉक्टरेट ऑफ मेडिसीन’ (डी.एम.) गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एक तर ‘डीएम’ कार्डीओलॉजी विभागाच्या दोन जागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०१३ नंतर या दोन्ही विभागाच्या जागा वाढल्या.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या नवीन निकषानुसार प्राध्यापकाला दोन, सहयोगी प्राध्यापकाला दोन तर सहायक प्राध्यापकाला दोन जागेला मंजुरी दिली. त्यानुसार ‘एमसीआय’ने वाढीव पीजीच्या जागांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागपूर मेडिकलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागाच्या वाढीव एक, कार्डिओलॉजी विभागाच्या वाढीव दोन जागांचा प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान ‘एमसीआय’चमूने पायाभूत सोयींचा पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता हे प्राध्यापक असल्याने त्यांच्या नावाने आणखी एक ‘पीजी’ची जागा मिळाली. आता या विभागात एकूण दोन जागा झाल्या आहेत. कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांना ‘पीजी’च्या दोन जागा मिळाल्या होत्या. सहयोगी प्राध्यापक असलेली डॉ. पी.पी. देशमुख यांच्या नावाने आता दोन जागा मिळाल्याने आता या विभागात एकूण चार जागा झाल्या आहेत. डॉ. देशपांडे व डॉ. गुप्ता यांना २०१३ मध्ये पहिल्यांदा ‘पीजी’ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी वाढीव जागा मिळाल्या आहेत.
कार्डिओलॉजीमध्ये आणखी एक कॅथलॅब उभारणार
मेडिकलशी संलग्न असलेल्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात ‘पीजी’ची एक तर कार्डिओलॉजी विभागत ‘पीजी’च्या दोन जागांची भर पडली आहे. याची दखल घेत विशेषत: कार्डिओलॉजी विभागात काही महिन्यांपूर्वीच एक नव्या कॅथलॅबचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या अर्थसंकल्पात याला प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच रुग्णांना होणार आहे.
डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल