नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:01 PM2021-01-22T12:01:06+5:302021-01-22T12:01:37+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना २०१९-२० सालचे राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाने घोषित केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना २०१९-२० सालचे राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाने घोषित केले आहेत. या पुरस्कारांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बाजी मारली आहे. नागपूर विद्यापीठाला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला एक पुरस्कार मिळाला आहे.
विद्यापीठाच्या रासेयोचे माजी संचालक डॉ. केशव वाळके यांची समन्वय प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याशिवाय नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या श्री लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळ येथील डॉ. अविनाश तितरमारे यांना कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार तर डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील मोहन वरठी यांची सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्यात येतो. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातून रेणुका मिरगे हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
‘कोरोना’ काळात मौलिक कार्य
‘कोरोना’मुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात नागपूर विद्यापीठाच्या रासेयो चमूने मौलिक कार्य केले. डॉ. केशव वाळके यांच्या नेतृत्वात ‘लॉकडाऊन’मध्ये महापालिकेच्या मदतीने विलगीकरण केंद्र आणि निवास गृहांमधील नागरिकांना रोज उत्तम भोजन पोहोचवण्याचे काम रासेयोच्या स्वयंसेवकांनी केले होते. याशिवाय डॉ. तितरमारे यांनीही कोरोना काळामध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी ग्रामीण भागामध्ये स्वयंसेवकांच्या मदतीने जनजागृती केली होती.