पॉलिटेक्निकसाठी तीन हजार अर्ज, प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:02+5:302021-07-24T04:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत तीन हजारांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत तीन हजारांच्या जवळपासच अर्ज नोंदणी झाली आहे. एकूण जागांच्या तुलनेत हा आकडा अर्धादेखील नाही. सीबीएसईचा खोळंबलेला निकाल व जात प्रमाणपत्र विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेला नाही. यामुळे अर्ज नोंदणीसाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी २९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची रुपरेषा जारी केली व ३० जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. नागपूर विभागात ५० महाविद्यालयांमध्ये एकूण १३ हजार १२६ जागा आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहतात. मागील तीन आठवड्यांत फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. यंदा दहावीचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण कमी होईल व जास्त प्रवेश होतील, अशी महाविद्यालयांना अपेक्षा आहे. मात्र शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत नागपूर विभागात तीन हजारांच्या जवळपासच अर्ज आले होते. राज्यातदेखील अर्जांची संख्या सुमारे ४० हजार आहे. सीबीएसई दहावीचा निकाल अद्याप लागलेला नाही. सोबतच अनेक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. अतिवृष्टीमुळे दळणवळणालादेखील फटका बसला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत वाढविली आहे. सीबीएसईचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे ही मुदत त्याहून समोर वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
महाविद्यालयांना दिलासा
दुसरीकडे यंदा बंपर निकालांमुळे जास्त नोंदणी होईल, अशी महाविद्यालयांना अपेक्षा होती. मात्र उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ध्या अर्जांचीदेखील नोंदणी झालेली नाही. त्यामुळे संचालनालयाने मुदतवाढ द्यावी, अशी महाविद्यालयांची मागणी होती. आता मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरायला पुरेसा वेळ मिळेल.
यंदा चांगले प्रवेश होतील
सीबीएसई दहावीनंतरदेखील अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात. राज्य शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेत तर बम्पर निकाल लागला आहे. त्यामुळे यंदा निश्चितच पॉलिटेक्निकला चांगले प्रवेश होतील. कागदपत्रांच्या अभावी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेला नाही, त्यांनी काळजी करू नये. त्यांचा विचार करूनच संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ.मनोज डायगव्हाणे यांनी व्यक्त केले.
सुधारित वेळापत्रक
अर्ज नोंदणी : ३० जुलैपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी : ३० जुलैपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी : २ ऑगस्ट
आक्षेप : ३ ते ५ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी : ७ ऑगस्ट