आपली बसच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:30 PM2020-05-13T20:30:10+5:302020-05-13T20:35:39+5:30
लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
आपली बस सेवेत कंडक्टर, चालक, तिकीट तपासनीस व विविध पदांवर तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाºयांना दर महिन्याला दहा तारखेपर्यंत वेतन मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बससेवा बंद आहे. मनपाच्या परिवहन विभागाने कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाची फाईल वित्त विभागाकडे सादर केली. मात्र ‘नो वर्क नो पेमेंट’ अशी भूमिका वित्त विभागाने घेतली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सदर्भात अधिक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
परिवहन विभागाकडे निधी उपलब्ध
कर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी परिवहन विभागाने १४ कोटींचा निधी ठेवला आहे. परंतु काम बंद असल्याने वित्त विभागाने वेतन देण्यास नकार दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे लॉकडाऊन कालावधीत तीन हजारांहून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.