राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या सुरक्षेवर तीन हजार पोलिसांचा ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 10:47 AM2023-07-04T10:47:55+5:302023-07-04T10:49:51+5:30

राष्ट्रपतींच्या ताफ्याची रंगीत तालीम : राजभवनाला छावणीचे स्वरूप

Three thousand police 'watch' on the security of President Draupadi Murmu's Nagpur visit | राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या सुरक्षेवर तीन हजार पोलिसांचा ‘वॉच’

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या सुरक्षेवर तीन हजार पोलिसांचा ‘वॉच’

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्याच्या कालावधीत तीन हजार पोलिस तैनात राहणार आहेत. जिल्ह्याबाहेरूनही पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले आहेत. याशिवाय राजभवनात सातशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी ही माहिती दिली. राष्ट्रपतींचे मंगळवारी रात्री आगमन झाल्यावर त्या विमानतळावरून थेट राजभवनात जाणार आहेत. बुधवारी कोराडी येथे मुख्य कार्यक्रमात त्या उपस्थित राहणार आहे. शहरात तीन दिवस राष्ट्रपतींचा बंदोबस्त असणार आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रपतींच्या बंदोबस्ताचा पोलिस आयुक्तांनी आढावा घेतला. राष्ट्रपतींच्या बंदोबस्तात ३ हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरून ५ पोलिस उपायुक्त, १६ सहायक पोलिस आयुक्त आणि ७०० होमगार्ड बोलविण्यात आले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरही पोलिस तैनात राहतील. सोमवारी राष्ट्रपतींच्या ताफ्याची रंगीत तालीम घेण्यात आली असून, मंगळवारीही विमानतळ ते राजभवनपर्यंत ही रंगीत तालीम करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

मंगळवारी राष्ट्रपती राजभवनात येणार असून, तेथे ७५० जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक-नाशक पथकाशिवाय जिल्ह्याबाहेरून १५ बॉम्ब शोधक-नाशक पथकाला नागपुरात बोलविण्यात आले आहे

जड वाहतुकीला निर्बंध

मंगळवारी विमानतळाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळीच रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येईल. तोपर्यंत शहरातील कोणताही रस्ता सुरक्षेच्या कारणावरून बंद करण्यात येणार नाही. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळी आवश्यकतेनुसार वाहतूक थांबविण्यात येईल किंवा वळविण्यात येईल. ४ जुलै ते ६ जुलै या कालावधीत नागपूर ते कोराडी, छिंदवाडा या मार्गावरील जड वाहतूक बंद राहील व नांदा फाटा येथे थांबविण्यात येईल. ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोडकडून येणारी जड वाहतूक कामठी नाका येथे वळविण्यात येईल. पारडी नाक्याकडून मानकापूरमार्गे छिंदवाडाकडे जाणारी वाहतूक कामठीमार्गे वळविली जाईल, तसेच शहराबाहेरील वाहतूक आउटर रिंग रोडने वळविण्याचे निर्देश वाहतूक उपायुक्त चेतना तिडके यांनी दिले आहेत.

- असा आहे राष्ट्रपतींचा नियोजित दौरा

  • ४ जुलै : सायंकाळी ७ वाजता : वायुसेनेच्या विशेष विमानाने नागपूरच्या विमानतळावर आगमन
  • सायंकाळी ७:२५ वाजता राजभवनात आगमन
  • ५ जुलै : सकाळी ८:४५ वाजता : राजभवनातून विमानतळाकडे रवाना
  • सकाळी ९:१० वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे रवाना
  • सकाळी १०:३० वाजता गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनाचा शिलान्यास. तसेच विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात सहभाग
  • सकाळी ११:५० वाजता : हेलिकॉप्टरने नागपूरला आगमन
  • दुपारी १२:४० वाजता : नागपूर विमानतळावरून राजभवनकडे रवाना
  • दुपारी ३:४५ ते ४:३० वाजेपर्यंत विशिष्ट लोकांना भेटणार
  • दुपारी ४:५० वाजता : कोराडी येथील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन
  • सायंकाळी ६:१० वाजता : राजभवनात आगमन व मुक्काम
  • ६ जुलै : दुपारी १२:३० वाजता नागपूर विमानतळाकडे रवाना
  • दुपारी १:४० वाजता वायुसेनेच्या विमानाने मुंबईकडे रवाना

दरम्यान, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल बैस हे मंगळवारी दुपारी ३:१५ वाजता पोहचतील तर मुख्यमंत्री शिंदे हे सायंकाळी ६:१५ वाजता येतील.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Three thousand police 'watch' on the security of President Draupadi Murmu's Nagpur visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.