एसटीच्या तीन हजार बस होणार ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:15 AM2021-01-13T04:15:20+5:302021-01-13T04:15:20+5:30

‘व्हीटीएस’ सिस्टीम : १७०० बसमध्ये बसविली जीपीएस यंत्रणा दयानंद पाईकराव नागपूर : खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर ...

Three thousand ST buses will be online | एसटीच्या तीन हजार बस होणार ऑनलाइन

एसटीच्या तीन हजार बस होणार ऑनलाइन

Next

‘व्हीटीएस’ सिस्टीम : १७०० बसमध्ये बसविली जीपीएस यंत्रणा

दयानंद पाईकराव

नागपूर : खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. यात आणखी एक पाऊल पुढे टाकत एसटी महामंडळाने विदर्भातील तीन हजार बस प्रवाशांसाठी ऑनलाइन करण्याची तयारी सुरू केली असून यातील १७०० बसमध्ये, तर नागपूर जिल्ह्यातील ४७० बसमध्ये जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे.

बसस्थानकावर गेल्यानंतर अनेकदा बसची वाट पाहत बसून राहावे लागते. चौकशी कक्षातील कर्मचाऱ्याने सांगितलेल्या वेळेनुसार कधीच बस सुटत नाही. याचा प्रवाशांना मनस्ताप होतो. प्रवाशांना या मनस्तापापासून दूर ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने एसटी बस प्रवाशांच्या मोबाइलवर ऑनलाइन दिसण्याची व्यवस्था केली आहे. त्यानुसार विदर्भातील तीन हजार बसमध्ये जीपीएस यंत्रणा लावण्यात येत आहे. यातील १७०० बसमध्ये ही जीपीएसची यंत्रणा लावण्यात आली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४७० बसचा समावेश आहे. बसमध्ये जीपीएस यंत्रणा लावल्यानंतर ही यंत्रणा प्रवाशांना प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘एमएसआरटीसी कम्युटर’ या अ‍ॅपद्वारे मोबाइलवरून हाताळता येणार आहे. यात प्रवाशांना या अ‍ॅपवर मार्ग टाकल्यानंतर या मार्गावर किती बस धावत आहेत, कोणती बस किती वेळात पोहोचेल, जवळचे बसस्थानक कोणते, मार्गातील थांबे याची माहिती मिळणार आहे. एखाद्या बसचा क्रमांक टाकल्यानंतर ही बस सध्या कुठे आहे याची अचूक माहिती मिळणार आहे. बसस्थानकावर बसलेल्या प्रवाशांना बसस्थानकावर लावलेल्या मॉनिटरच्या माध्यमातून बसची माहिती उपलब्ध होणार आहे. मार्गात एखाद्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहितीसुद्धा त्वरित बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. एसटीच्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्येही जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून त्यांना आपल्या मोबाइलवर बसची अचूक माहिती मिळविणे शक्य होणार आहे. सध्या नागपूर विभागातील मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसची माहिती प्रवाशांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मिळविता येत असून लवकरच विदर्भातील तीन हजार बस या माध्यमातून ऑनलाइन होणार आहेत.

......................

बसमधील महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था

‘एमएसआरटीसी काॅम्युटर’ या अ‍ॅपमध्ये एसटी बसमध्ये बसलेल्या महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या महिलेने सुरक्षेबाबत इमर्जन्सी बटन दाबल्यास या महिलेची तक्रार संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाइलवर जाणार आहे. त्यानंतर त्वरित या महिलेस सुरक्षा पोहोचविण्यात येणार आहे. तसेच इमर्जन्सी बटनवर गाडी ब्रेकडाऊन झाल्यास, वैद्यकीय मदत लागल्यास आणि बसचा अपघात झाल्यास त्वरित सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

...............

प्रवाशांना यंत्रणेचा फायदा होईल

‘एमएसआरटीसी काॅम्युटर’ या अ‍ॅपमुळे एसटी बसमधील प्रवाशांना तसेच बसस्थानकावर बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. त्यांना बसची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवासात काही अडचण आल्यास या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांची तक्रार एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.’

- शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई

..........

Web Title: Three thousand ST buses will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.