नागपुरात तीन हजारावर ‘सुपर स्प्रेडर्स’ची ‘ऑन दी स्पॉट’ ‘कोरोना टेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 08:32 PM2022-01-08T20:32:28+5:302022-01-08T20:33:53+5:30
Nagpur News नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे.
नागपूर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने धोका वाढला आहे. धोका टाळण्यासाठी कोरोनाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. शनिवारी तीन हजार ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी करण्यात आली. शिवाय विनामास्क फिरणाऱ्यांना शहरात ठिकठिकाणी अडवून ऑन दी स्पॉट टेस्ट करण्यात आली.
शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खासगी कार्यालयात काम करणाऱ्या तीन हजाराहून अधिक सुपर स्प्रेडर्सची कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी विविध भागात मोहीम राबविण्यात आली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या चमूद्वारे मनपाच्या दहाही झोनमध्ये चाचणी मोहीम राबविली जात आहे.
मागील काही दिवसापासून नागपूर शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांना लक्षणे दिसत नसले तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे ते कोरोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर्स ठरत आहेत. अशांची शनिवारी दारोडकर चौक, कमाल चौक परिसरातील नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या चमूसोबत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. शुभम मनगटे उपस्थित होते.
मास्क न वापरणाऱ्यांची चाचणी
कोरोना संक्रमण वाढत असतानाही बाजारात अनेकजण विनामास्क फिरतात. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. कॉटन मार्केट चौकात विनामास्क आढळून आलेल्या नागरिकांना उपद्रव शोध पथकाने पकडून त्यांची कोरोना चाचणी केली. यामुळे मास्क न वापरणाऱ्यांनाही धडा मिळाला.