नागपुरात एकाच रात्रीत तीन वाहने जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 08:10 PM2019-09-16T20:10:06+5:302019-09-16T20:11:45+5:30
रविवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज आणि जरीपटक्यात समाजकंटकांनी हैदोस घातला. घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांची तोडफोड करून पेटवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज आणि जरीपटक्यात समाजकंटकांनी हैदोस घातला. घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांची तोडफोड करून त्यांनी पेटवून दिले. वेळीच गस्तीवरील पोलिसांच्या नजरेत हा प्रकार आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, झायलो, स्कॉर्पिओसह तीन वाहनांचे जाळपोळीमुळे मोठे नुकसान झाले.
लकडगंजचे पोलीस पथक दिघोरीकर चौक परिसरात सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास गस्त करीत होते. त्यांना परम मेडिकलसमोर झायलो कार जळताना दिसली. शिपाई महेंद्र महादेवराव क्षीरसागर यांनी लगेच अग्निशमन पथकाला माहिती देऊन बोलवून घेतले. अग्निशमन पथकाने तातडीने तेथे पोहचून झायलोची आग विझविली. मात्र, तोपर्यंत आगीत कारचे मोठे नुकसान झाले होते. येथून पोलीस पुढे निघाले असता त्यांना स्कॉर्पिओचे डिझेल टँकचे झाकण उघडे दिसले. आरोपींनी स्कॉर्पिओलाही आग लावून पेटवण्याचा प्रयत्न केला होता.
अशीच एक घटना रविवारी मध्यरात्री जरीपटक्यात घडली. नालंदानगर नारी रोडवरील सुरेंद्र शंकरराव बागडे (वय ४०) यांनी त्यांची बोलेरो पीकअप व्हॅन रंगारी यांच्या वॉल कंपाऊंडला लावून उभी केली होती. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अज्ञात आरोपींनी व्हॅनला आग लावून ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बागडे यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली.
सोमवारी सकाळपासून या घटनांचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. एकाच रात्रीत तीन मोठ्या वाहनांना आग लावण्यात आल्याचे कळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, लकडगंज आणि जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधाशोध
शहरात यापूर्वीही वाहने जाळण्याच्या, तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वेगवेगळ्या भागात एकाच रात्री अशा प्रकारच्या सारख्या घटना घडल्याने पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनांना आगी लावून पेटवून देणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.