नागपुरातील तीन तरुणींची राजस्थानात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:46 PM2018-11-08T21:46:50+5:302018-11-08T21:47:45+5:30

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून या टोळीच्या तावडीतून तिन्ही पीडित तरुणींची सुटक केली.

Three women from Nagpur were sold in Rajasthan | नागपुरातील तीन तरुणींची राजस्थानात विक्री

नागपुरातील तीन तरुणींची राजस्थानात विक्री

Next
ठळक मुद्देदेहविक्रीच्या दलदलीत ढकलले : रॅकेटचा उलगडा, दोघींना अटक : यशोधरानगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून या टोळीच्या तावडीतून तिन्ही पीडित तरुणींची सुटक केली. त्यांना विकणाऱ्या टोळीतील रतबबाई बिरमचंद मीना (वय ३३, रा. झालवाड, राजस्थान) आणि नूरजहां शेख कलीम (वय ३३, रा. गुलशननगर, कळमना) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार मात्र फरार आहेत.
पीडित तरुणी २० ते ३३ वयोगटातील असून त्या कळमना, इमामवाडा आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. कळमन्यातील तरुणीची आरोपी नूरजहांसोबत ओळख होती. तिच्या माध्यमातून अन्य दोघींसोबत ओळख झाली. सर्वसाधारण घरच्या या तरुणींना राजस्थानमध्ये मोठ्या पगाराची चांगली नोकरी मिळवून देण्याची बतावणी नूरजहांने केली. तिच्या भूलथापांना बळी पडलेल्या तरुणींसोबत नूरजहांने तिच्या दलाल साथीदारांची विविध कंपनीतील अधिकारी म्हणून ओळख करून दिली. या सर्वांनी दाखविलेल्या आमिषाला बळी पडून तरुणी राजस्थानमध्ये नोकरी करण्यासाठी तयार झाल्या. नूरजहां हिने दलाल राजू ऊर्फ आत्माराम पन्नालाल रॉय (वय ३४, रा. वनदेवीनगर, यशोधरानगर), हसन कुरेशी शेख (वय ४०) या दोघांसोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी तरुणींना चांगले कपडे, मेकअप बॉक्स तसेच अन्य चीजवस्तूंसाठी रक्कम उपलब्ध करून दिली. त्यानंतर राजस्थानमध्ये सेक्स रॅकेट चालविणारा बिरम मीना तसेच रतनबाई मीना या दोघांनी तरुणींचे फोटो पाहून त्यांना विकत घेण्याची तयारी दाखवली. मोठ्या रकमेत तिघींचा सौदा केल्यानंतर त्यांना नागपुरातील नूरजहां आणि तिच्या साथीदार दलालांनी २३ आॅक्टोबरला राजस्थानमध्ये पोहचवले. झालवाडमधील रतनबाईच्या अड्ड्यावर या तिघींना नेल्यानंतर त्यांच्याकडून देहविक्रय करून घेण्यात येऊ लागला. आपल्याला नोकरी नव्हे तर देहविक्रयासाठी आणण्यात (विकण्यात) आल्याचे या तरुणींच्या लक्षात आले तेव्हा फार उशीर झाला होता. ४ नोव्हेंबरपर्यंत रतनबाईच्या कुंटणखान्यावर त्यांना नरकयातना देण्यात येत होत्या. तरुणींनी आपली सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्या सतत नजरकैदेत असल्याने ते शक्य झाले नाही.

अखेर भंडाफोड झाला
महिला-मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आरोपी राजू रॉय आणि हसन शेख हे अंमली पदार्थाचीही तस्करी करतात. त्यांना काही दिवसांपूर्वी भोपाळ रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी नागपुरातील तीन मुलींची राजस्थानमध्ये विक्री केल्याची खळबळजनक माहिती उघड केली. त्यामुळे भोपाळ पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना तरुणींच्या विक्रीचे प्रकरण आणि आरोपींची नावे सांगितली. ती यशोधरानगर पोलिसांना कळताच पोलिसांनी धावपळ सुरू केली. नूरजहांला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक राजस्थानमधील रतनबाईच्या अड्ड्यावर धडकले. तेथून तिला ताब्यात घेतल्यानंतर पीडित तरुणींचीही सुटका करण्यात आली. या कारवाईनंतर रतनबाईचे दलाल साथीदार पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Three women from Nagpur were sold in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.