सुधाकर गायधनी यांना लागाेपाठ तीन विश्व सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 09:34 PM2021-05-22T21:34:59+5:302021-05-22T21:36:35+5:30
Sudhakar Gaidhani मराठी साहित्यात महाकवी म्हणून ओळख असलेले ख्यातकीर्त कवी सुधाकर गायधनी यांना काेलंबिया, पेरू आणि बांगलादेश या राष्ट्रांतील जागतिक साहित्य संस्थांकडून लागाेपाठ तीन विश्व सन्मान प्राप्त झाले आहेत. मराठी कवीला तीन जागतिक सन्मान प्राप्त हाेणे ही मराठी साहित्यविश्वासाठी गाैरवाची बाब ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी साहित्यात महाकवी म्हणून ओळख असलेले ख्यातकीर्त कवी सुधाकर गायधनी यांना काेलंबिया, पेरू आणि बांगलादेश या राष्ट्रांतील जागतिक साहित्य संस्थांकडून लागाेपाठ तीन विश्व सन्मान प्राप्त झाले आहेत. मराठी कवीला तीन जागतिक सन्मान प्राप्त हाेणे ही मराठी साहित्यविश्वासाठी गाैरवाची बाब ठरली आहे.
पहिला सन्मान काेलंबिया येथील संस्थेचा आहे. गायधनी यांची ‘येशूचे कफन’ या कवितेला ईस्टरच्या काळात जगातील वाचकांची सर्वाधिक पसंती मिळाल्याचे सांगत संस्थेच्या प्रमुख लुझमिला रॅमाेस यांनी त्यांना बहुमान बहाल केला. उल्लेखनीय म्हणजे कवितेचा अनुवाद स्पॅनिश, जर्मनी, इटालियन, राेमानियन, अरेबियन, ग्रीक व अल्बानियन, आदी भाषांमध्ये भाषांतर करण्यात आला. गायधनी यांचा दुसरा सन्मान दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातून आहे. येथील प्रा. डाॅ. सॅम्युअल कॅव्हेराे फाउंडेशनकडून विश्व पुस्तक व स्पॅनिश भाषा दिनाच्या निमित्ताने गायधनी यांना ‘महाकाव्य’ या काव्याच्या निर्मितीबद्दल या वर्षीचा ‘दि वर्ल्ड ॲण्ड हिसॅपनिक अमेरिकन गाेल्डन पेन अवाॅर्ड’ जाहीर करण्यात आला. हा अवघ्या मराठी साहित्यविश्वाचा गाैरव असल्याची बाब गायधनी यांच्या मानपत्रात नमूद करण्यात आली आहे.
बांगला देशातील ‘पाेएट्री ॲण्ड लिटरेचर वर्ल्ड व्हिजन’ या जागतिक संस्थेतर्फे गायधनी यांचा ‘विश्व समकालीन कवी’ म्हणून निवड करण्यात आली. गायधनी यांच्या या तिहेरी सन्मानाने मराठी साहित्यजगताची मान उंचावली आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीच गायधनी यांना भूतान देशाकडून ‘आंतरराष्ट्रीय शांतिदूत सन्मान’ प्रदान करण्यात आला हाेता.