एमआरआय काढत असतानाच चिमुकल्याचा मृत्यू; ‘एम्स’मधील घटना, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 03:05 PM2022-04-01T15:05:40+5:302022-04-01T15:12:41+5:30

संकल्पचे काका चेतन सालवटकर यांनी या प्रकरणाची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. यात त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला.

three year old child dies while undergoing MRI; case filed against docors | एमआरआय काढत असतानाच चिमुकल्याचा मृत्यू; ‘एम्स’मधील घटना, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

एमआरआय काढत असतानाच चिमुकल्याचा मृत्यू; ‘एम्स’मधील घटना, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

Next
ठळक मुद्देपालकाची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारासाठी आलेल्या तीन वर्षीय मुलाचा ‘एमआरआय’ काढत असतानाच मृत्यू झाला. या प्रकरणाची पालकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मेडिकलने शवविच्छेदनानंतर विविध अवयवांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवले आहे.

संकल्प चहांदे (३ वर्षे) असे त्या मृताचे नाव. प्राप्त माहितीनुसार, या चिमुकल्याच्या डाव्या पायात रक्तवाहिन्यासंबंधी विकृती होती. याचे निदान करण्यासाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले. बुधवारी सायंकाळी एम्समध्येच ‘एमआरआय’ करीत असताना तो पाय हलवित होता. यामुळे त्याला कमी प्रमाणात भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले. रक्तवाहिन्यांमधील विकृती स्पष्ट दिसण्यासाठी ‘कॉन्ट्रास्ट’ देखील देण्यात आले. यावेळी क्ष-किरण तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते. ‘एमआरआय’ काढत असताना त्यात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यामुळे डॉक्टरांनी त्याला आपत्कालीन कक्षात नेऊन तातडीच्या उपचाराला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री शवविच्छेदनासाठी मृतदेह नागपूर मेडिकलमध्ये पाठविण्यात आला.

-डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

संकल्पचे काका चेतन सालवटकर यांनी या प्रकरणाची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. यात त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला. सालवटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संकल्पवर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ‘एम्स’च्या ओपीडीमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी एमआरआय होईल, असे सांगून सोमवारी बाळाला दाखल केले. पण त्याला दिवसभर उपाशी ठेवल्यानंतरही एमआरआय झाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा एमआरआयसाठी त्याला उपाशी ठेवण्यात आले, आणि एकामागून एक तीन इंजेक्शन्स दिली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

-शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत भाष्य करणे चुकीचे

‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनीष शिरीगिरीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत या विषयावर कोणतेही भाष्य करता येणार नाही. ‘एम्स’कडे स्वत:ची ‘पीएम’ सुविधा नसल्याने मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला आहे. ही दुर्दैवी घटना आहे.

-दुपारी झाले शवविच्छेदन

संकल्पचा मृतदेह बुधवारी रात्री मेडिकलच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. गुरुवारी दुपारी शवविच्छेदन झाले. येथील डॉक्टरांच्या मते, विविध अवयवांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवले. सोनेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले की, सध्या आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read in English

Web Title: three year old child dies while undergoing MRI; case filed against docors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.