विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:42 PM2018-07-16T22:42:12+5:302018-07-16T22:44:12+5:30
सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत २०१६ मध्ये घडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत २०१६ मध्ये घडली होती.
प्रभाकर महादेव होले (७३) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पीडित बालिका सात वर्षे वयाची होती. बालिकेचे कुटुंब आरोपीच्या घरी भाड्याने राहात होते. १ आॅक्टोबर २०१६ रोजी बालिकेची आई मुलाला शाळेत सोडायला गेली होती. बालिका एकटीच घरी होती. दरम्यान, आरोपीने घरात प्रवेश करून बालिकेचा विनयभंग केला. पोलीस तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.
कारचालकाला शिक्षा
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निष्काळजीपणे कार चालवून अपघात करणारा आरोपी राजेश गणपत चांदेकर (४२) याला कमाल सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, कारमुळे जखमी झालेल्या नेहा जयस्वाल यांना ५००० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश आरोपीला दिला. आरोपी जुनी मंगळवारी येथील रहिवासी आहे. अपघाताची घटना २६ जून २०१४ रोजी दुपारी १२ च्या सुमारास हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत घडली होती. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. चारुशीला पौनीकर यांनी कामकाज पाहिले.