तीन वर्षात नागपूर टँकरमुक्त
By admin | Published: August 1, 2016 02:20 AM2016-08-01T02:20:29+5:302016-08-01T02:20:29+5:30
नागपूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २४ बाय ७ योजनेंतर्गत दोन हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
नितीन गडकरी : लक्ष्मणराव सोमासाव बरबटे चौकाचे लोकार्पण
नागपूर : नागपूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २४ बाय ७ योजनेंतर्गत दोन हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. यामुळे ८० दलघमी पाण्याची बचत झाली. अनधिकृत वस्त्यांमध्ये जलवाहिनीची कामे करू न शकल्याने शासनाने याबाबतचा निर्णय घेतला व ही समस्या सोडविली. त्यामुळे येत्या तीन वर्षात नागपूर टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर महापालिकेतर्फे लकडगंजमधील लक्ष्मणराव सोमासाव बरबटे चौकाचे लोकार्पण तसेच गायत्री टॉवर ते मोखारे कॉम्प्लेक्स पर्यंतच्या सिमेंट रस्त्यांचे भूमिपजन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर टिंबर भवन, लकडगंज येथे मुख्य सोहळा झाला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. गिरीश व्यास, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, किशोर कुमेरिया, नगरसेवक अनिल धावडे, संगीता कळमकर, शितल घरत, मुख्य अभियंता उल्हास देबडवार व रतन बरबटे, विशाल बरबटे आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, नागपूरची काळी माती विचारात घेता येथे डांबरी रस्ते दोन- तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आपण सिमेंट रस्त्यांचा प्रकल्प हाती घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या केल्या. यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यास सुरुवात झाली आहे. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी इथेनॉलवर चालणाऱ्या ५० बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेट्रो रेल्वे, ई-रिक्षा आदी लोकोपयोगी निर्णय याच काळात घेतले गेले आहेत. गरिबांना स्वस्तात घरे देण्याची योजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री बावनकुळे यांनी शहरात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. लक्ष्मणराव बरबटे यांनी नगरसेवक म्हणून दिलेल्या योगदानावर आ. कृष्णा खोपडे यांनी प्रकाश टाकला. बाल्या बोरकर यांनी संबंधित चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी बरबटे परिवारातर्फे १० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे, सतीश बरबटे, नीलेश बरबटे, किशोर बरबटे, शैलेंद्र हारोडे, नेहा बरबटे, सीमा हारोडे, रावसाहेब चिमोटे, मेघराज मैनानी, संजय वाघवानी, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. हर्षद घाटोळे यांनी केले. सतीश बरबटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)