तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचे केले व्हायरल,गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:36 PM2020-03-20T22:36:36+5:302020-03-20T22:40:59+5:30
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका ठेवल्याची बाब एका पोर्टल चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविली.पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, एक तरुणी आणि अन्य एक व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका ठेवल्याची बाब एका पोर्टल चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविली. सदर चुकीच्या बातमीचे प्रसारण केल्यावरुन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गुन्हा उमरेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. डॉ. सचिन धमगाये असे तक्रारकर्त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, एक तरुणी आणि अन्य एक व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणी ग्रामीण रुग्णालयात आल्या होत्या. त्यांची तपासणी मी स्वत: केली. त्यांनी कोरोना संसर्गाचा संशय असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याचे सांगितले होते. त्यावरून केस रिपोर्टवर तशी नोंद इंग्रजीत केल्याचे डॉ. धमगाये यांनी सांगितले. डॉ. सचिन धमगाये यांनी नमूद केलेल्या नोंदीनंतर सदर तरुणी नागपूर मेयोला तपासणीसाठी गेल्या. त्यांचा कोरोना निगेटिव्ह असा अहवाल आलेला आहे. उमरेड पोलीस ठाण्यात १८८, ३४ भादंवि, सहकलम ५४ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.