प्लाझ्मा दानासाठी तीन तरुणांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:13 AM2021-02-28T04:13:14+5:302021-02-28T04:13:14+5:30
उमरेड : रक्तदान चळवळीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या उमरेड तालुक्यात प्लाझ्मा दानासाठीही तरुण पुढाकार घेत आहेत. शहरातील तीन तरुणांनी ...
उमरेड : रक्तदान चळवळीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या उमरेड तालुक्यात प्लाझ्मा दानासाठीही तरुण पुढाकार घेत आहेत. शहरातील तीन तरुणांनी एकाच वेळी प्लाझ्मा दान करीत सामाजिक सक्रियता दाखविली. मुकुल लुले, निखिल नवनागे आणि दिगेश पाटील (नागपूर) अशी प्लाझ्मा दान करणाऱ्या या तरुणांची नावे आहेत.
शहरातील काही व्हाॅट्सॲप ग्रुपवर अशोक कन्या विद्यालयाचे शिक्षक राजेश बांदरे यांनी प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले. त्यांच्या मित्राला प्लाझ्माची गरज भासली. या आवाहनाला लागलीच मुकुल लुले, निखिल नवनागे, तसेच नागपूर येथील दिगेश पाटील या तिघांनाही प्रतिसाद दिला. नागपूर येथील जीवनज्योती रक्तपेढीमध्ये त्यांनी हे सत्कार्य केले. यापूर्वीही अमित लाडेकर, राहुल यादव, विपीन भांडारकर यांनीही प्लाझ्मा दान करीत सामाजिक दायित्व पार पाडले आहे. निखिल नवनागे आणि अमित लाडेकर यांनी दोनदा प्लाझ्मा दान केले, हे येथे विशेष. या तरुणांचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.