प्रदेश काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:16 AM2017-09-16T01:16:37+5:302017-09-16T01:17:50+5:30
विदर्भातील नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या नेत्यांनी एक दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
काँग्रेस पक्षाला आपली ताकद दाखविण्यासाठी एक दबावगट तयार केला आहे. या गटातील नेत्यांची शुक्रवारी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नागपुरातील बंगल्यावर बैठक झाली. तीत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष विदर्भभर साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच हे निमित्त साधत प्रदेश काँग्रेस व विलास मुत्तेमवार यांच्यावर नेम साधण्याचा मुख्य अजेंडा घेऊन रणनीती आखण्यात आली. या बैठकीत चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, प्रदेश सचिव नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, कृष्ण कुमार पांडे, नरू जिचकार आदी उपस्थित होते. या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे राज्यसभेवर विजयी झाल्यानंतर दिल्ली येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांना हटविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महिनाभरातच विदर्भातील ही नेतेमंडळी पुन्हा एकत्र आली व उघडपणे वेगळ्या विदर्भ काँग्रेसची मागणी केल्याने प्रदेश काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
या बैठकीत २४ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान इंदिराजींच्या जन्मशताब्दीनिमित्त विदर्भभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा व याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भातील कुठल्याही एका कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत जाऊन निमंत्रण देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सोनिया गांधीकडे मागणी करणार : मोघे
विदर्भाची स्वतंत्र प्रदेश काँग्रेस स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भाला एक वेगळे महत्त्व मिळेल. १९७७ ते १९८४ या काळात विदर्भ रिजनल कॉँग्रेस अस्तित्वात होती. विदर्भात काँग्रेस मजबूत करायची असेल व त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी हे आवश्यक आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पूर्वीच अशी मागणी करण्यात आली आहे. आता अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन विदर्भ काँग्रेसची मागणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व मान्य नाही : अनिस अहमद
अनिस अहमद म्हणाले, विदर्भातील नेत्यांना प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व मान्य नाही. येत्या काळात विदर्भ काँग्रेसची मागणी ताकदीने लावून धरली जाईल. बैठकीबाबत सतीश चतुर्वेदी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
राऊतही विदर्भ काँग्रेसच्या समर्थनात
माजी मंत्री नितीन राऊत यांनी देखील वेगळ्या विदर्भ प्रदेश काँग्रेसचे समर्थन केले. ते म्हणाले, नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. त्यामुळे येथील काँग्रेस कमिटीही स्वतंत्र असावी. यापूर्वी अशी कमिटी अस्तित्वात होती. तिला पुनरुज्जीवित करणे काळाची गरज आहे. यापूर्वीही ही मागणी हायकमांडकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुत्तेमवार यांचे मौन
दरम्यान, विदर्भातील नेत्यांच्या या बैठकीबाबत विचारणा केली असता आपल्याला काही भाष्य करायचे नाही, असे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले. इंदिराजींच्या जन्मशताब्दीनिमित्त गेल्यावर्षी नागपुरात मोठा कार्यक्रम घेण्यात आला. प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर कार्यक्रम सुरू असून विदर्भातील कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील कोणत्या नेत्यांनी काय बैठक घेतली याची माहिती नाही. मला या विषयावर कुठलेही भाष्य करायचे नाही.
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस